ठाणे पोलिसांकडून येत्या चार ते पाच दिवसांत कारवाई
किशोर कोकणे
ठाणे : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम थेट १० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. नववर्ष स्वागत, नाताळच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांवर अंकुश राहावा यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून आठवडाभरात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात जय्यत तयारी सुरू असून विशिष्ट नाके, चौकांवर पुढील काही दिवसांपासून पोलीस तपासणी सुरू करण्यात येणार आहे.
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला तसेच नाताळच्या सणानिमित्ताने पब, हॉटेल, ढाब्यांमध्ये जंगी मद्य पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. अपघात टाळण्यासाठी मद्यपीने वाहन चालवू नये असा नियम आहे. या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असते. त्यांच्यावर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. दंडाची रक्कम कमी असल्याने काही वाहनचालकांकडून पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन होत असते.
नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार आता मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांना १० हजार रुपये दंडाची आकारणी करता येऊ शकते. येत्या चार ते पाच दिवसांत ठाणे पोलिसांकडून ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
मद्यपी चालकांविरोधात येत्या चार ते पाच दिवसांत ठाणे वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून नव्या मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणार आहेत.
– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
