डिसेंबरच्या महासभेत चार प्रकल्पांचा प्रस्ताव ; आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडय़ा, धोकादायक आणि बेकायदा इमारतींसाठी आखण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेतील चार नागरी समूह आराखडय़ांचा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे  सादर करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या आदेशामुळे समूह पुनर्विकास योजनेला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडय़ा, धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येणार असून त्यासाठी शहरात समूह पुनर्विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजना राबविण्यासाठी राज्य शासनानेही मान्यता दिली असून ऑक्टोबर महिन्यात योजनेचा शुभारंभ होणार होता. मात्र, सूचना आणि हरकतींचे निराकारण करण्याची प्रक्रिया सुरूअसल्यामुळे योजनेचा शुभारंभ होऊ शकला नाही. तसेच योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याने या संपूर्ण परिसराचे फेर सर्वेक्षण सुरूकरण्यात आले असून त्यामुळेही योजनेच्या अंमलबजावणीस विरोध होत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनेचा आढावा घेतला. तसेच समूह पुनर्विकास योजनेला गती मिळावी यासाठी चार नागरी समूह आराखडय़ांचा प्रस्ताव डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले.

नागरी समूह विकास योजनेंतर्गत विविध पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यासाठी डिसेंबर महिन्यातच उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यात येणाऱ्या गृहसंकुलातील सदनिका लीजऐवजी मालकी हक्काने देण्यासंदर्भात शासनाकडून अभिप्राय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.