घडय़ाळ स्थिर असले तरी वेळ चंचल असते. आपले घडय़ाळ सांभाळून ठेवू शकतो, वेळ नाही. काळाचा महिमा सांगणारी अशी अनेक वचने प्रसिद्ध आहेत. ठाण्यातील श्रीनिवास वामन नाईक यांनी माणसांना काळ आणि वेळेचे भान देणारी निरनिराळ्या प्रकारची घडय़ाळे जपण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात १९३० पासून आजवर बाजारात आलेली तब्बल २५० प्रकारची वैशिष्टय़पूर्ण घडय़ाळे आहेत. विशेष म्हणजे त्यातील एकही ते मनगटावर बांधत नाहीत.
व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेल्या श्रीनिवास नाईक यांना चार दशकांपूर्वी घडय़ाळे जमविण्याचा छंद जडला. १९७१ मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना एच.एम.टी.चे तारीख-वार दाखविणारे घडय़ाळ भेट म्हणून दिले. आताच्या स्मार्ट मोबाइलप्रमाणे तारीख-वार दाखविणारी घडय़ाळे त्या वेळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते.
श्रीनिवास यांच्या संग्रहात १९३० पासूनची विविध प्रकारची, निरनिराळ्या कंपन्यांची तब्बल २५० घडय़ाळे आहेत. नाईक म्हणतात, माझ्या लहानपणी घडय़ाळ प्रतिष्ठित लोक हातात घालायचे. १९५६-५७च्या काळात त्यांच्या शाळूसोबत्याच्या मनगटावर त्याचे ‘स्वत:’चे घडय़ाळ होते. इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो कुतूहलाचा विषय होता. त्यांच्या शेजाऱ्यांच्या आफ्रिकेतील एका नातेवाइकाने येताना तारीख दाखवणारे घडय़ाळ आणले होते. शेजारी राहणारा तो मित्र अभिमानाने ते मनगटावर बांधी. त्या काळी एच.एम.टी, फँावर ल्युबा, रोमर जी अशा कंपन्यांची घडय़ाळे साधारण शंभर ते दोनशे रुपये किंमतीला मिळायची, परंतु यापैकी एकही घडय़ाळ आपल्याजवळ असावे, हा विचारही त्या वेळी मनाला शिवला नव्हता.
पुढे नोकरी करत असताना त्यांच्या साहेबांच्या मनगटावर सिटिझनचे चावी असलेले एक आगळेवेगळे घडय़ाळ नाईकांनी पाहिले. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्या घडय़ाळात गजर होता. तो गजर १५ ते २० फुटांपर्यंत ऐकू येत असे. अशा प्रकारची त्या काळच्या गजराची घडय़ाळे नाईक यांच्या संग्रहात आहेत. तसेच १९७५-७६ च्या सुमारास स्त्रियांसाठी खास पेंडंट वॉच (गळ्यातील साखळीमधील घडय़ाळ) बाजारात आली होती. ती मिळवणे सोपे नव्हते. खूप शोधल्यानंतर एक घडय़ाळ त्यांना फाउंटनच्या टाइम वॉचच्या शोरूममध्ये मिळाले. १९८४-८५च्या सुमारास एका घडय़ाळ दुरुस्ती करण्याऱ्याशी त्यांची ओळख झाली. पुढे या नव्या सोबत्याने त्यांच्या छंदाला भरभरून मदतच केली.
सोने-चांदी ते सौर ऊर्जा
श्रीनिवास नाईक यांच्या संग्रहात सध्या सोन्या-चांदीचे प्लेटिंग असणारी पेंडंट वॉच, जुन्या काळातील डिजिटल घडय़ाळे, गजराची मनगटी घडय़ाळे, पॉकीट वॉच अशी विविध प्रकारची घडय़ाळे आहेत. टेबलावरील ठेवण्यात येणारी काही जुनी घडय़ाळेही त्यांच्याकडे पाहायला मिळतात. तसेच रेमन्ड कंपनीची दोन हलक्या वजनाची दोन घडय़ाळे आपले लक्ष वेधून घेतात. नाईक यांच्या संग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याजवळ शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपये एवढय़ा किमतीच्या घडय़ाळाचा संग्रह आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याच्या घडय़ाळाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ‘सौर ऊर्जेवर’ चालणारे दुर्मीळ मनगटी घडय़ाळही आहे. सेकंदच्या काटय़ाऐवजी धावणारी आगगाडी दाखवणारे घडय़ाळ हे सर्वात लक्षवेधी आहे.