मालवाहतूक करणाऱ्या कंपनीचे मागील दोन महिन्यांत सहा कोटींचे नुकसान; तीन हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडाला

आकांक्षा मोहिते

ठाणे : मागील दोन महिन्यांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर असल्याने एसटी सेवा ठप्प आहेत. याचा फटका जनतेबरोबरच एसटीतून मालवाहतूक करणाऱ्या खासगी कंपनीलादेखील बसत आहे. मागील दोन महिन्यांपासून एसटीतून मालवाहतूक करणाऱ्या खासगी कंपनीचे सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाप्रमाणे पैसे दिले जात असल्याने त्यांचा रोजगारदेखील बुडाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीतून आर्थिक फायदा मिळावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने खासगी कंपन्यांना एसटीतून मालवाहतूक करण्यास परवानगी दिली. २००५ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली. या कामाचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात विविध मालांची एसटीतून वाहतूक केली जाते. यातून कंपन्यांना आर्थिक फायदा मिळण्याबरोबरच महामंडळालाही उत्पन्न मिळते. एसटी महामंडळाकडून दर तीन वर्षांनी निविदा प्रक्रिया राबवून या कामाचा ठेका देण्यात येतो. नेमण्यात आलेल्या मालवाहतूक कंपनीची राज्यभरात प्रत्येक आगारानुसार सुमारे २८५ कार्यालये आहेत. त्यातून जवळपास तीन हजार कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीच्या माध्यमातून एसटीतून दूध, दुग्धजन्य पदार्थ, कपडे, पुस्तके, अन्नधान्य, बी-बियाणे अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची राज्यभरात मालवाहतूक केली जाते. वस्तूचे वजन आणि किलोमीटर याप्रमाणे त्यांचे दर आकारले जात असून अवघ्या २४ तासांत वस्तू पोहोचविण्याचे काम कंपनीमार्फत करण्यात येते.  जलद सेवा असल्यामुळे त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

दर दिवसाला राज्यभरातून ११ ते १२ हजार मालाची वाहतूक होते. एकूण उत्पन्नातील ६० टक्के हिस्सा कंपनीला, तर उर्वरित ४० टक्के हिस्सा महामंडळाला मिळतो. दिवसाला दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न कंपनीला मिळते, तर महामंडळाला ४ लाखांचे उत्पन्न मिळते. करोनाकाळात या व्यवसायाला मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तेव्हा एसटी सेवा बंद असल्यामुळे ६० टक्के व्यवसाय बुडाला होता. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे चक्र पुन्हा सुरळीत झाले; परंतु एसटी संपाचा फटका या सेवेला बसून ती पुन्हा विस्कळीत झाली आहे.  एसटी संपामुळे राज्यभरातील मालवाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी, मागील दोन महिन्यांच्या कालावधीत या खासगी कंपनीचे सुमारे सहा कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

एसटीच्या संपकाळात कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांचा  रोजगारही बुडत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे परवाना शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ईश्वरलाल चिचाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुनिया कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड