अंबरनाथ व बदलापूर पालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये झालेले घोळ आता बहुतेक राज्य व जिल्हा प्रशासनाला मान्य झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्चला उशिरा हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन हरकतींसोबतच ऑफलाइन हरकती लेखी अर्ज व निवासाच्या दाखल्यासह स्वीकारण्याचा निर्णय सरतेशेवटी घेतला. मात्र तो निर्णय उशिराने कळल्याने बहुतेक नागरिक त्यापासून अनभिज्ञच राहिले.
अनेक नावांवर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हरकती घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच शहराबाहेरील नावांवर तांत्रिकदृष्टय़ा हरकती घेता येत नव्हत्या. यामुळे ऐन वेळी हा निर्णय घेतल्याचे समजते; परंतु या निर्णयामुळे मतदार याद्यांमध्ये घुसलेली बोगस नावे, वगळलेली नावे व एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मोठय़ा प्रमाणावर गेलेली नावे या घोळांबद्दल शिक्कामोर्तब झाले आहे. ‘लोकसत्ता’ने गेले काही दिवस हा घोळ उघडकीस आणणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र हा निर्णय म्हणजे प्रशासनाला उशिरा जाग आल्याचे द्योतक असून हरकती घेण्याची प्रक्रिया ही ऑनलाइनसोबत ऑफलाइनही झालेली आहे हे अंबरनाथ व बदलापुरातील मतदारांना माहीत झालेले नाही. त्यामुळे या ऐन वेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा हरकत घेणाऱ्या मतदारांना कितपत होईल यात शंका निर्माण झाली आहे.
 दरम्यान हरकतींचे आकडे फुगत चालले असून अंबरनाथमध्ये १६ मार्चच्या संध्याकाळपर्यंत २२ हजार ऑनलाइन हरकती आल्या होत्या, तर बदलापुरात हरकतींचा आकडा वाढत असून २८ हजाराच्या वर या हरकती पोहोचल्या आहेत. पालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार यातील ८ हजार ४४ हरकती या नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी सोडविल्या आहेत, तर या एकूण हरकतींपैकी १२ हजार ५९७ हरकती या एकाच नावावर दोनदा अथवा तीनदा घेण्यात आल्याने हा हरकतींचा आकडा वाढला असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. या हरकती घेण्यामागे शहरातील राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्या यंत्रणेसह कार्यान्वित झाल्या असल्याचे समजत असून काही सजग नागरिकांनीही हरकती घेतल्याचे कळते आहे.