tv15याच जमिनीला लागून सरकारी, वन विभागाच्या जमिनी आहेत. या जमिनी पडीक आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मात्र या भागात एक नवीन पीक आले आहे. चार ते पाच उडाणटप्पू एकत्र येतात. एखाद्या देवाच्या नावाने बांधकाम कंपनी स्थापन करतात. रेल्वे स्थानक भागातील मोक्याच्या ठिकाणी चकाचक कापरेरेट कार्यालय सुरू करतात. कार्यालय एसी, फाडफाड मराठी, इंग्रजी बोलणाऱ्या तरुणी ग्राहकांशी पोपटपंची करण्यासाठी ठेवल्या जातात. अशी दोन ते तीन  लाखाची गुंतवणूक करून ही उडाणटप्पू बोगस बांधकाम क्षेत्रातील मंडळी स्थानिक भागात आपले बस्तान बसवतात.
मुंबईतील हिंदी वर्तमानपत्रांत कल्याण परिसरात स्वस्तात घरे मिळत असल्याच्या जाहिराती देतात. विशेषत: देवनार, चेंबूर, तुर्भे, धारावी अशा झोपडपट्टी भागात आपली जाहिरात कशी पोहचेल यासाठी विशेष प्रयत्न ही मंडळी करतात. या फसव्या जाहिराती बघून मुंबई, ठाणे परिसरातील झोपडपट्टी, चाळ भागातील लोक आपल्या मुंबईतील घराची किंमत किती असा अंदाज बघून कल्याण, डोंबिवली परिसरात स्वस्तात घरे बघण्यासाठी येतात.
लोक घरे बघण्यासाठी कार्यालयात आले की प्रथम त्यांना चहा, कॉफी, बिस्कीट, शीतपेय देऊन खूश केले जाते. मग, बिल्डर कंपनीची बस बांधकामे सुरू असल्याच्या ठिकाणी जाते. कामे सुरू असतात श्रीमलंगगडाच्या परिसरात संरक्षण दलाच्या विमानतळाच्या जागेवर, काटई-नेवाळी, बदलापूर रस्त्यालगतच्या सरकारी, वन जमिनीवर. एक ते दोन चाळींची बांधकामे फक्त येणाऱ्या लोकांना दाखवण्यासाठी उभारली जातात. जमिनीचे कागद वगैरे आपल्या नावे असल्याचे खोटेच सांगितले जाते. बनावट कागदपत्रे लोकांना दाखवली जातात. चाळ स्वरूपाची ही बांधकामे असतात. एका खोलीसाठी तीन लाख ते पाच लाख रुपये आकारण्यात येतात. मुंबईत आयुष्य काढलेला माणूस मागचापुढचा विचार न करता मुंबईतील आपल्या घराची किंमत करतो. ती किंमत २० ते २५ लाखापर्यंत जाते. या रकमेच्या तुलनेत कल्याणजवळ स्वस्तात घर मिळतेय, असा विचार करून दुसऱ्या घराची लगेच ग्राहकाकडून एक ते तीन लाखांपर्यंत टोकन रक्कम देऊन गुंतवणूक केली जाते. घराचा सहा महिने, वर्षभरात ताबा मिळेल म्हणून ग्राहकाला सांगितले जाते. टोकन रक्कम उडाणटप्पू बिल्डर टोळीच्या हातात येते.
चाळी दोनच, त्यामध्ये खोल्या चोवीसच. पण त्या बघण्यासाठी, खरेदी करण्यासाठी शेकडो लोक येतात. एकेक खोली चार-चार पाच-पाच ग्राहकांना विकण्यात येते. असा धंदा राजरोसपणे सुरू असतो. एखादा ग्राहक जागरूक असेल तर संशय येताच पोलिसांकडे जातो आणि मग असा बिल्डर तावडीत सापडतो. पण त्याआधी अनेकांचे पैसे त्याने गट्टम केलेले असतात. गेल्या पाच वर्षांत या भागात अशा २० कथिक बिल्डरांनी सर्वसामान्यांचे कोटय़वधी रुपये लाटले आहेत.
पांडू बिल्डर कंपनी
असाच एक प्रकार अलीकडेच उघडकीला आला आहे. विठ्ठलवाडी येथे राहणाऱ्या विजय चव्हाण याने हारून खान, विलास पाटील यांच्या सहकार्याने पांडू बिल्डर आणि डेव्हलपर्स ही बांधकाम कंपनी स्थापन केली. मलंगगड, नेवाळी परिसरात चाळ स्वरूपाची घरे बांधून ती विकण्याचा घाट या पांडू कंपनीने घातला. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील सर्वोदय संकुलाच्या तळमजल्याला विजयने बांधकाम कंपनीचे कार्पोरट कार्यालय सुरू केले. नेहमीप्रमाणे चाळीतील खोल्या स्वस्तात विकण्याची आकर्षक जाहिरातबाजी सुरू केली. झोपडपट्टी, चाळी, सामान्य लोक त्याला भुलू लागले. घर खरेदीसाठी टोकन रकमा बिल्डर कार्यालयात जमा झाल्या. १ कोटी ९६ लाखाचा दौलतजादा या पांडू कंपनीने जमा केला. केलेल्या गुंतवणुकीच्या काही पटीने पैसे जमा झाल्यानंतर आता बस्स, असे म्हणून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पांडू कंपनीने कार्यालय बंद करून पलायन केले. लोक घर कधी मिळणार म्हणून तगादा लावू लागले. घर नसेल तर पैसे परत द्या म्हणून सांगू लागले. सुरुवातीला पांडू कंपनीला येणारे लोकांचे भ्रमणध्वनी उचलले जात होते. तेही नंतर बंद झाले. घर बुडाले, पैसे गेले असे जेव्हा लोकांना कळले, तेव्हा नवी मुंबईतील राहुल शेवाळे या गुंतवणूकदाराने कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्यात पांडू कंपनीविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांकडून बुडव्या बिल्डरांचा पाठलाग सुरू झाला. दोन ते तीन महिने पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर विदर्भातील अकोला भागातील माळराजुरा गावात विजय चव्हाण लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सदानंद कामेरकर, अनुप कामत, सुनील गावीत, दत्तात्रय चौरे यांचे पथक माळराजुराला धडकले. साध्या वेशात पोलिसांनी चव्हाण राहात असलेल्या परिसराची पाहणी केली. मग एका रात्री व्यूहरचना करून चव्हाणला ताब्यात घेण्यात आले.
विजय चव्हाणची कल्याण पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या ‘पांडू’ कंपनीच्या बाकी साथीदारांचा शोध सुरू आहे. या कंपनीने लाटलेल्या सर्वसामान्यांच्या पैशांचाही पोलीस शोध घेत आहेत. अनेकदा अशा गुन्ह्यांत अटक झालेले बोगस बिल्डर जामिनावर सुटतात आणि पुन्हा आपले उद्योग सुरू करतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. कमी पैशांत आपल्याला परवडेल असे टुमदार घर प्रत्येकालाच हवे असते. त्यामुळे लोक अशा ‘पांडू’ बिल्डरांच्या जाळय़ात ओढले जातात. मात्र, स्वस्तातल्या घराची इच्छा ठेवताना त्या घराशी संबंधित कायदेशीर बाबीही तपासणे आवश्यक आहे. अन्यथा घराचे स्वप्नमोडतेच; पण अशा अपप्रवृत्तींनाही मोकळे रान मिळते.
भगवान मंडलिक