अनेकदा चालत्या दुचाकीवर तसेच रिक्षांवर हल्ले
वसई : वसईच्या नायगाव कोळीवाडा येथे भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आधीच करोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नायगाव ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
नायगाव पूर्व परिसरात करोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नायगाव परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यात आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे महिला, वृद्ध मंडळी, लहान मुले गांगरून गेली आहेत. अनोळखी इसम वा वाहनचालक दिसला की भटकी कुत्री त्याच्या अंगावर धावून जातात. काही वेळा चालत्या रिक्षातील प्रवाशाच्या अंगावरही उडी घेतात. असे प्रकार नायगाव परिसरात वारंवार घडू लागले आहेत. एकटादुकटा माणूस दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेला किंवा फेरफटका मारण्यासाठी निघाला, की या मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे.
मध्यंतरी अर्नाळा समुद्र किनारपट्टीवर एका लहानग्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. नायगाव परिसरातदेखील लहानगी मुले, वृद्ध मंडळी, स्त्रिया यांना या मोकाट कुत्र्यांचा मोठा धोका आहे. महापालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वसई-विरार शहर महापालिका परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आधीपासूनच ऐरणीवर आला आहे. केवळ एक श्वान निर्बीजीकरण केंद्र महापालिकेकडे असून सुमारे ६० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या पालिका हद्दीत आहे. ‘युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी’ या संस्थेकडून महापालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम केले जाते.
भटक्या कुत्र्यांची दहशत ही केवळ एका भागापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण वसई-विरार प्रदेशात या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. पालिकेने यावर त्वरित उपाययोजना करावयास हवी. पालिकेचे एकच निर्बीजीकरण केंद्र आहे. वस्तुत: सर्व प्रभाग समितींमध्ये अशा प्रकारची केंद्रे सुरू करून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणास गती द्यायला हवी.
– रमाकांत पाटील, स्थानिक
महापालिकेची निर्बीजीकरण क्षमता कमी आहे. निर्बीजीकरण आणि कुत्र्यांचा जन्मदर यांचे समीकरण जुळत नसल्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे.
– डॉ. हनुमंत शेळके, अध्यक्ष, युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी