अनेकदा तक्रारी करूनही विद्युत विभागाचे दुर्लक्ष

भाईंदर : मीरा रोड येथील अनेक भागांत गेल्या महिनाभरापासून पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी काळोख असतो. या संदर्भात तक्रार करूनदेखील आजवर त्याची दखल घेतली जात नसल्याची माहिती स्थनिकांनी दिली.

मीरारोडच्या सृष्टी परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी असते. तसेच या भागात नागमोडी वळणे असल्यामुळे रात्रीच्या सुमारास उजेडाची आवश्यकता असते. परंतु गेल्या महिन्याभरापासून या भागात अंधार असल्यामुळे रात्री फेरफटका मारायला निघालेले नागरिक आणि वाहने एकमेकांवर आदळत आहे. सुदैवाने अद्यापही गंभीर दुर्घटना झाली नसली तरी भविष्यात होण्याची शक्यता वाढली आहे.

मीरा-भाईंदर शहरांतील अनेक परिसर अंधारात आहेत. रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामांमुळे काही काळाकरिता पथदिवे बंद करण्यात येतात. परंतु विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे पथदिवे पुन्हा सुरू करण्यातच येत नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. महानगरपालिकेकडून पथदिव्याच्या विज बिलाकरिता वार्षिक ९० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. अशा परिस्थितीत त्या पथदिव्यांची योग्य देखरेखदेखील होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे गेले काही दिवस पथदिवे बंद होते, परंतु आजच त्यावर काम सुरू असून लवकरच चालू होतील.

– जतिन जाधव, उपअभियंता, मीरा-भाईंदर महापालिका