डोंबिवली एमआयडीसी भागातील रिजन्सी अनंतम येथून सोनारपाडा येथे शिवाजीराव जोंधळे इंजिनीअरींग महाविद्यालयात दुचाकीवरून जात असताना एका अनोळखी दुचाकी स्वाराने विद्यार्थिनी बसलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वार विद्यार्थिनीच्या मागे बसलेल्या कल्याणमधील विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर दुचाकी स्वार घटनास्थळावरून पळून गेला.

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता प्रेम ऑटो भागात राहणाऱ्या नेहा सुनील बत्तीसे यांची मुलगी सृष्टी बत्तीसे (१९) ही डोंबिवली एमआयडीसी सोनारपाडा भागात असणाऱ्या शिवाजीराव जोंधळे इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेते. सृष्टी दररोज आपली वर्ग मैत्रिण सोनल तिवारी हिच्या दुचाकीवरून सोनारपाडा येथील शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात सकाळच्या वेळेत येते.

कल्याण शीळफाटा रस्त्यावरील गोळवली येथील रिजन्सी अनंतम येथून जोंधळे महाविद्यालय रस्त्याने जात असताना अचानक एक २५ वयोगटातील दुचाकी स्वार भरधाव वेगाने सोनल तिवारी चालवित असलेल्या दुचाकीच्या दिशेने आला. काही कळण्याच्या आत त्याने सोनलच्या दुचाकीला जोराची धडक दिली. दुचाकी स्वार सोनल, पाठीमागे बसलेले सृष्टी दोघीही दुचाकीसह रस्त्यावर पडल्या. दुचाकी स्वाराने सृष्टी बसलेल्या ठिकाणी जोराची धडक दिल्याने सृष्टीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

बचावासाठी दोघीही ओरडत असताना ठोकर दिलेला बेशिस्त दुचाकी स्वार दोन्ही विद्यार्थिनींना मदत करण्याऐवजी आपणास लोक मारतील. पोलीस पकडतील या भीतीने तेथून पळून गेला. घडला प्रकार सृष्टीने घरी आईला कळविला. आई नेहा बत्तीसे या घटनास्थळी आल्या. मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन या अपघातासंबंधी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रिजन्सी अनंतम भागातील सीसीटीव्ही चित्रिकरण पाहून आरोपींचा शोध घेण्यात आहे, असे पोलिसांनी सांगितले.