प्रेमप्रकरणातून दोघांकडून महाविद्यालयासमोरच चाकूहल्ला; गुन्हा दाखल
सागर्ली येथील ‘साऊथ इंडियन’ महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रणय सुरेश मोरे (२०) या विद्यार्थ्यांची दोन तरुणांनी महाविद्यालय परिसरात भरदिवसा चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी विघ्नेश सरकटे (२०) याच्यासह दोघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
प्रणय हा पालकांसह डोंबिवली पश्चिमेतील जलाराम आशीष सोसायटीमध्ये राहत होता. तो सागर्ली येथील ‘साऊथ इंडियन असोसिएशन’ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पहिल्या वर्षांत शिकत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी तो महाविद्यालयात गेला. दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर तो प्रवेशद्वाराबाहेर मित्रांसोबत बोलत उभा होता. त्यावेळी तेथे आलेल्या दोन तरुणांनी त्याच्याशी बोलण्याच्या बहाण्याने त्याला बाजूला नेले. त्यानंतर या दोघांनी प्रणयच्या छाती व मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंर दोघेही पळून गेले.
प्रणयचा मदतीसाठी आक्रोश ऐकल्यानंतर त्याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रणय रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्रांनी त्याला तातडीने शिवम रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असतानाच प्रणयचा मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या परिसरात भरदिवसा ही हत्या झाल्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. त्रिकोणी प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
- प्रणयचे वडील सुरेश मोरे हे दोन दिवसांपूर्वीच महाविद्यालयात पालक सभेला येऊन गेले होते. माझ्या मुलासोबत असे काही घडेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
- प्रणयचे कोणाशी भांडण नव्हते. मात्र, तो महाविद्यालयातील एका मुलीशी बोलायचा. त्याचा राग त्या मुलीच्या प्रियकराला होता. यातूनच त्याची हत्या झाली असावी, असे प्रणयच्या मित्रांनी सांगितले. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.