पनवेल-दिवा-भिवंडी-वसई लोकलची प्रतीक्षा
वसई-पनवेल आणि दिवा-वसई या मार्गावरून धावणाऱ्या शटलसेवांचा लाभ भिवंडी शहराला होत असला, तरी या सेवांच्या अपुऱ्या संख्येमुळे यावर मर्यादा येत आहेत. हेच टाळण्यासाठी या भागात लोकलसेवा सुरू करून मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हर्बर मार्गाला जोडणारी वाहतुकसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सध्या रेल्वे प्रशासनासमोर विचाराधीन आहे. मात्र यावर तत्काळ निर्णय घेऊन या भागात लोकलसेवा सुरू करून देण्याची मागणी येथील लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तर वसई-पनवेल, दिवा-वसई याबरोबर ठाणे आणि कल्याण स्थानकातूनसुद्धा भिवंडी मार्गे वसईच्या दिशेने लोकल गाडय़ा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या रेल्वेसेवांमुळे भिवंडी रोड स्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, त्यानुसार जंक्शन स्थानक म्हणून यामध्ये सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत.
रेल्वे वाहतूक सेवेपासून वंचित शहर म्हणून भिवंडी शहराची असलेली ओळख गेल्या काही वर्षांमध्ये बदलू लागली असून दिवा-वसई, पनवेल-डहाणू शटलसेवेच्या माध्यमातून भिवंडी स्थानक पश्चिम आणि मध्य दोन्ही रेल्वेसेवांना जोडले गेले आहे. डिझेलवर धावणाऱ्या डेमू या रेल्वेमार्गावरून धावत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डिझेल इंजिनमध्ये बिघाडाच्या घटनाही घडत असतात, त्यामुळे या भागातील प्रवाशांना सुरळीत प्रवासासाठी विजेवर चालणाऱ्या लोकलची मागणी गेल्या काही वर्षांपासून येथील खासदार आणि लोकप्रतिनिधींकडून केली जाऊ लागली आहे. त्या दृष्टीने रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून या भागाचे सर्वेक्षण सुरू झाले असून, प्रवासी संख्या आणि तेथील व्यावसायिक महत्त्व याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे दिवा आणि पश्चिम रेल्वेचे वसई ही दोन स्थानके प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची स्थानके असून, त्यांना जोडण्यासाठी भिवंडी रोड मार्गे रेल्वे वाहतूक सोयीची होऊ शकणार आहे. यामुळे सुमारे ७० किमीचा आणि सुमारे दोन तासांचा प्रवास टाळणे शक्य होऊ शकणार आहे. त्यामुळे या भागातील लोकलसेवेची मागणी लोकप्रतिनिधींकडून जोर धरू लागली असून, प्रवासी संघटनांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात अद्याप तरतूद नसली, तरी मुंबईतील वाहतूक सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मोनोरेल..
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ठाणे-भिवंडी आणि कल्याण या तीन शहरांना जोडणारी मोनोरेल सुरू करण्याविषयीही चाचपणी सुरू असून, त्यादृष्टीने प्रकल्प तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा मार्ग तीनही शहरांना जोडणारा एकमेव पर्याय म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. त्यानुसास सर्वेक्षण प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
कसा असेल मोनोरेल प्रकल्प..
२३.७५ किमीचा हा मार्ग ठरवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ स्थानके यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत.

३ हजार १६९ कोटी खर्च यासाठी प्रस्तावित आहे.

पुढील १० ते १५ वर्षांमध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतो.

सद्य:स्थिती – या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल बनवून त्याची तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवहार्यता पाहणी करण्यात आली आहे.

 

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suburban service
First published on: 04-09-2015 at 00:37 IST