सुहास जोशी, अभिनेत्री
वाचन म्हणजे जगातील सर्व गोष्टींचा विविध अंगांनी अनुभव घेणे. जे आपण प्रत्यक्ष पाहू किंवा अनुभवू शकत नाही, असे अनेक विषय वाचनामुळे आपल्याला ज्ञात होतात. वाचन हे एक असे टॉनिक आहे की ज्यामुळे आपल्या विचारांना पाझर फुटतो आणि आपले विचार एकमार्गी, एकढंगी न राहता सर्व बाजूस विस्तारत राहतात. लहानपणी माझा आणि वाचनाचा फारसा संबंध नव्हता. माझ्या वडिलांना पुस्तक वाचायचे खूप वेड होते. मला मात्र दहावीपर्यंत तरी वाचनाची गोडी लागली नव्हती. किंबहुना कुणी मला वाचनाचे महत्त्व सांगितले नाही. त्यात मला अभ्यासाची पुस्तकेही जास्त वाचायला आवडत नसल्याने मी वाचनाचे महत्त्व समजून घेतले नाही. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर मी आणि पुस्तक यामध्ये वेगळे नाते निर्माण झाले आणि आजवरच्या जीवन प्रवासात वाचनात आलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांनी ते नाते अधिकाधिक दृढ होत गेले.
माझे संगीत शिक्षक केशवराव भोळे यांच्यामुळे महाविद्यालयीन जीवनात मला वाचनाची गोडी लागली. मला ते दर आठवडय़ाला त्यांच्या ग्रंथालयातील एक पुस्तक वाचायला देत आणि वाचलेल्या पुस्तकाचा मला कळलेला अर्थ आठवडय़ाच्या शेवटी ते मला विचारत. यामुळे हळूहळू मी पुस्तक वाचण्याच्या प्रेमात पडले. अन्नाइतकेच पुस्तक वाचणे हा जीवनातील आवश्यक भाग असल्याचे मला त्यानंतर समजले. सध्या माझ्याकडे अडीचशे ते तीनशे पुस्तकांचा संग्रह असून पुस्तकांसाठी मी घरातच एक ग्रंथालय केले आहे. जसा वेळ मिळेल तशी मी पुस्तके वाचत असतो. मला सर्वात जास्त ऐतिहासिक पुस्तके आणि कादंबऱ्या वाचायला आवडत असल्या तरी माझ्या वाचनाची सुरुवात केशवराव भोळे यांच्या ‘अस्थायी’ आणि ‘अंतरा’ या पुस्तकापासून झाली. रणजीत देसाई यांचे ‘स्वामी’, ‘श्रीमानयोगी’, पु.ल.देशपांडे यांचे ‘असामी आसामी’, ‘बटाटय़ाची चाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी अनेक पुस्तके मी महाविद्यालयीन जीवनात वाचली. विनोदी पुस्तकांबरोबरच पु.लंचे वंगचित्रे हे वैचारिक लेखसुद्धा मी आवडीने वाचले. दिल्ली ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर विजय तेंडुलकर, राम गणेश गडकरी, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांच्या नाटकांचे वाचन झाले. मराठी लेखकांबरोबरच हिंदी भाषेतील लेखक मोहन राकेश यांची ‘आधेअधुरे’, ‘पेर तले की जमीन’ ही पुस्तके, ‘बादल सरकार’ आणि मधु राय यांची एवम इंद्रजित, बाकी इतिहाश, चेहेरा, कामिनी अशी बंगाली आणि गुजराती भाषेतील अनुवादित पुस्तकेसुद्धा वाचली. अभिनय आणि नाटय़शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी स्टालिस्कावास्की यांची सगळी पुस्तके अभासपूर्ण वाचली. ड्रामा स्कूलमध्ये आम्हाला तमाशा विषयावर एक पेपर असल्यामुळे ग्रामीण साहित्याशी माझा खूप जवळून संबंध आला. ग. दि. माडगूळकर लिखित लावण्या माझ्या वाचनात आल्या. ड्रामा स्कूलनंतर पुढील काही वर्षे माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे माझे वाचन थोडेसे कमी झाले, परंतु ५ ते ६ वर्षांनंतर परत मी पुस्तके वाचावयास सुरुवात केली. माझ्या नवऱ्यामुळे मला इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा परिचय झाला.भारतीय लेखकांनी इंग्रजीमध्ये लिहिलेली पुस्तकेही मी वाचली आहेत. मला विविध प्रांतामधील वैशिष्टय़पूर्ण असे प्रांतीय साहित्य वाचायला आवडते. ‘वाईज अॅण्ड अदरवाईज’, ‘बकुळा’, ‘पितृऋण’, ‘दंडकारण्य’ अशा सुधा मूर्ती आणि प्रतिमा जोशींच्या काळजास भिडणाऱ्या कथा मी आवडीने वाचते. सुनीता देशपांडे लिखित ‘आहे मनोहर तरी’, ‘मण्यांची माळ’, ‘मनातले अवकाश’ या पुस्तकातून घडलेल्या मराठी भाषेच्या श्रीमंतीचे दर्शन थक्क करणारे आहे. जयवंत दळवी यांच्या कथा, आर.के.नारायण यांचे ‘मालगुडी डेज’सारखे सदाबहार पुस्तक, श्री.ना.पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’, अंबरीश मिश्र यांची ‘सुंदर ती दुसरी दुनिया’, ‘शुभ्रकाही जीवघेणे’, जी.ए. कुलकर्णी यांची ‘काजळ माया’, अमृतफळे, एस.एल.भैरप्पा यांच्या ‘पर्व’ यासारख्या कादंबऱ्या मी वाचल्या आहेत. बा.भ.बोरकर, इंदिरा संत,कुसुमाग्रज यांच्या कविता तसेच ग.दि.माडगूळकर लिखित गीतरामायणसुद्धा मी खूप वेळा वाचले आहे. विश्वास पाटील यांचे ‘महानायक’, ‘झाडाझडती’, ‘पानिपत’, प्रभाकर पेंढारकर यांची ‘रारंगढांग’ अशी अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. विश्राम बेडेकर यांचे ‘एक झाड दोन पक्षी’, श्रीराम लागूंचे ‘लमाण’, दुर्गाबाई खोटे, दादा कोंडके आदींची आत्मचिरत्रेही मी वाचली आहेत. सध्याच्या वाचनातील मला भावलेले पुस्तक म्हणजे बाया कर्वे यांचे ‘माझे पुराण.’ माझ्या पुस्तकांची शेअरिंग ही सर्वात जास्त सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर व्हायची आणि त्यांनीच मला पहिल्यांदा ‘चार्ली चॅप्लिन’ यांचे चरित्र वाचायला दिले होते. मला सर्व प्रकारची पुस्तके, मासिके, वैचारिक लेख वाचायला आवडत असल्याने प्रवास करतानाही मी पाककलाविषयक मासिके वाचत असते. स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे यांची चरित्रे हरवली, तेव्हा मला खूप हळहळ वाटली होती. वाचनाच्या संदर्भात मी एक सांगेन की विविध प्रकारची पुस्तके वाचा. आपली प्रगल्भता वाढविण्याचा तोच एक मार्ग आहे. विविध विषयांवरील अधिकाधिक पुस्तके वाचूनच आपण जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.