टँकरमधून ॲसिड उडाल्यानं तीन जण होरपळले; भर चौकात घडली घटना

नागरिकाने टँकर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या एका धावत्या टँकरमधून सल्फ्युरिक ॲसिड नावाचे रसायन बाहेर उडाल्याने त्यानंतर मागील तीन वाहनांवरील तिघेजण होरपळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उल्हासनगर शहरातील कॅम्प चार भागात समोर आली. कॅम्प ४ भागातील श्रीराम चौकातून हा टँकर जात होता. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले होते.

मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा संबंधित टँकर श्रीराम चौकातून जात असताना गतिरोधकारवर आदळला. या टँकरचे झाकण सैल असल्याने त्यातील काही रसायन मागून येणाऱ्या वाहन चालकांवर उडाले. टँकरच्या मागून येणाऱ्या दुचाकीवरील भरत वसीटा, कुणाल वसीटा आणि दिलीप पुरस्वानी यांच्या अंगावर सल्फ्युरिक ॲसिड हे रसायन उडाल्याने तिघेही किरकोळ भाजले. तर रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या एका मोटरसायकलचेही या घटनेत नुकसान झाले. या घटनेनंतर तात्काळ भरत आणि कुणाल वसीटा यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. तर दिलीप पुरस्वानी यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीनही होरपळलेल्या व्यक्तींची प्रकृती स्थिर असून सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे. याप्रकरणी टँकर चालक राकेश राणा याला काही वेळातच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा टँकर कोणत्या कंपनीतून आणला गेला याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sulfuric acid ulhasnagar kalyan 3 injured vsk

Next Story
“शिवसेनेबाबत निर्णय फक्त मी घेणार, पक्षातील इतर कोणी…”; आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी