या महिन्यात शुक्रवार दि. २० मार्च रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, युरोप, उत्तर आफ्रिका आणि उत्तर पश्चिम आशिया येथून दिसणार आहे. सन २०१५ मधील हे पहिलेच ग्रहण आहे. शुक्रवार २० मार्च रोजी उत्तररात्री ४ वाजून १६ मिनिटांनी सूर्य सायन मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करील. याला विषुवदिन म्हणतात. शनिवार, २१ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. शालिवाहन शक वर्ष १९३७ चा प्रारंभ होणार आहे. या दिवशी सूर्य ठीक पूर्व क्षितिजावर उगवणार आहे.
मार्च महिन्यात रात्री दहा वाजता पूर्व क्षितिजावर चित्रा आणि स्वाती या तारका उगवलेल्या दिसतील. डावीकडील ठळक तारका आहे ती स्वाती! आणि उजवीकडील ती चित्रा! चित्रा तारका आपल्यापासून २६० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. तिची प्रत अधिक १.०४ एवढी आहे. स्वाती तारकेची प्रत वजा ०.०६ एवढी असून ती आपल्यापासून ३६ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. चित्रा तारकेच्या वरच्या बाजूला हस्त नक्षत्रातील पाच तारका दिसतील. पूर्व आकाशात उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील ‘डेनेबोला’ ही तारका दिसेल, तर तिच्या वरच्या बाजूस पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील दोन तारका दर्शन देतील. पूर्व आकाशात वरच्या बाजूस मघा नक्षत्रातील तारका दिसतील.
उत्तर आकाशात ध्रुव तारकेच्या डाव्या बाजूला वायव्य दिशेस शर्मिष्ठा नक्षत्राची ‘एम’ तारकाकृती दिसेल. उजव्या बाजूला ईशान्य आकाशात सप्तर्षीची पतंगाकृती सुंदर दर्शन देईल. पश्चिम क्षितिजावर अश्विनी नक्षत्र मावळत असेल. पश्चिम आकाशात कृत्तिका, रोहिणी, मृग नक्षत्रातील तारका दर्शन देतील. मध्य आकाशात पुनर्वसू नक्षत्रातील समांतर भुज चौकोनाची तारकाकृती लक्ष वेधून घेईल. याला ‘हेट ऑफ दी हेवन’ म्हणजे ‘स्वर्गद्वार’ म्हणतात. कारण यातूनच सर्व ग्रह भ्रमण करतात. दक्षिण आकाशात ‘अगस्ती’ ठळक तारका सुंदर दर्शन देईल.
चंद्र : फाल्गुन पौर्णिमा गुरुवार, दि. ५ मार्च रोजी रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी पूर्ण होईल. शुक्रवार दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी फाल्गुन अमावास्या पूर्ण होईल. चैत्र महिन्याची नूतन चंद्रकोर शनिवार २१ मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर दिसेल. तिचे दक्षिणेकडील शृंग उंच दिसेल.
बुध ग्रह : बुध ग्रह २४ मार्चपर्यंत सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्व क्षितिजावर दिसेल. २५ मार्चपासून २२ एप्रिलपर्यंत तो सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. बुध. ३ मार्च रोजी धनिष्ठा, १३ मार्च रोजी शततारका, २२ मार्च रोजी पूर्वा भाद्रपदा आणि २९ मार्च रोजी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करील.
शुक्र ग्रह : तेजस्वी शुक्र ग्रह रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर ठळक दर्शन देईल. तो १ मार्च रोजी रेवती, १२ मार्च रोजी अश्विनी आणि २३ मार्च रोजी भरणी नक्षत्रात प्रवेश करील.
मंगळ ग्रह : मंगळ ग्रह रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर दर्शन देईल. मंगळ ५ मार्च रोजी रेवती, २३ मार्च रोजी अश्विनी नक्षत्रात प्रवेश करील.
गुरू ग्रह : गुरू ग्रह रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात बराच वर आश्लेषा नक्षत्रात ठळक दर्शन देईल.
शनी ग्रह : शनी ग्रह पहाटे पश्चिम आकाशात अनुराधा नक्षत्रात दर्शन देईल.
मार्चमधील खगोलीय घटना’
३ मार्च – गुरू-चंद्र युती. गुरू चंद्राच्या पाच अंश उत्तरेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्वेस हे पाहता येईल.
’५ मार्च – चंद्र पृथ्वीपासून दूर ४ लक्ष ६ हजार ३८५ कि.मी.
’१२ मार्च – शनी-चंद्र युती. शनी चंद्राच्या दोन अंश दक्षिणेस दिसेल. मध्यरात्रीनंतर पूर्वेला दिसेल.
’२० मार्च – चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ५८४ कि.मी.
’२२ मार्च – मंगळ-चंद्र युती. मंगळ चंद्राच्या एक अंश उत्तरेस. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर दर्शन होईल.
’२३ मार्च – शुक्र-चंद्र युती. शुक्र चंद्राच्या तीन अंश उत्तरेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर पाहता येईल.
’२५ मार्च – चंद्र-रोहिणी युती. रोहिणी चंद्राच्या एक अंश दक्षिणेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात दिसेल.
’३० मार्च – गुरू-चंद्र युती. गुरू चंद्राच्या सहा अंश उत्तरेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी मध्य आकाशात दिसेल.
दा. कृ. सोमण