स्वामी देवप्रकाश गार्डन, कानसई, अंबरनाथ (पूर्व)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदललेल्या जीवनपद्धतीमुळे बरीचशी सधन कुटुंबे आपल्याच जातीधर्माच्या लोकांसोबत राहणे पसंत करतात. अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या वेशीवर असलेल्या कानसई विभागातील स्वामी देवप्रकाश गार्डन वसाहतीत मात्र सर्वधर्मसमभाव दिसून येतो. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबे असलेले हे संकुल राष्ट्रीय एकात्मकतेचा आदर्श आहे.

अंबरनाथमधील कानसई भागात उल्हासनगरच्या वेशीवर स्वामी देवप्रकाश गार्डन ही वसाहत आहे. सात मजले असलेल्या या सोसायटीचे बांधकाम २००० मध्ये सुरू झाले होते. तीनच वर्षांत येथे सोसायटीची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली. तेव्हापासून संकुलातील सदस्यांनी सोसायटीची जबाबदारी हाती घेतली. एकूण ११२ सदनिका असलेल्या स्वामी देवप्रकाश गार्डनमध्ये विविध धर्म, पंथ, जातींची कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदतात. त्यात महाराष्ट्रीय, देशाच्या इतर प्रांतांतील कुटुंबे तसेच सिंधी भाषकांचा समावेश आहे. विविध जाती-धर्माच्या सदस्यांमुळे एक छोटा भारतच इथे राहत असल्याचा अनुभव येत असतो. या सर्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार झाले आहे. त्यात विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून हे नाते अधिकच दृढ होत जाते. स्वामी देवप्रकाश गार्डनमध्ये विविध सण-उत्सव साजरे केले जातात. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सिंधी समुदायाचा बेहराणा, झुलेलाल जन्मोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे केले जातात. कोणत्याही धर्माचा उत्सव असला तरी सर्वच सोसायटीचे सभासद उत्साहाने यात सहभागी होत असतात. त्यामुळे एक संकुल एक कुटुंब असे वातावरण पाहायला मिळते. यात ज्येष्ठांसह तरुणाईचा सहभागही मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो.

सोसायटीचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी कार्यकारिणी असली तरी विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांची मदत घेतली जाते. त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील सर्वसमावेशकता आणि निर्णयाला असलेला पाठिंबाही वाढण्यास मदत होत असते. स्वच्छतेसाठीही सोसायटी पुढाकार घेत असते. या विषयावर विशेष लक्ष देऊन अस्वच्छता टाळण्यासाठी सदस्य स्वत: प्रयत्न करीत असतात. त्यामुळे सोसायटीच्या आवारात फिरताना एक वेगळा आनंद मिळत असतो. करभरणा करण्यासाठी सोसायटीतील समिती सदस्यांना प्रेरित करत असते. त्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना एक ठरावीक दिवस नियोजन करून आमंत्रित केले जाते. त्यामुळे एकाच दिवसात सुमारे शंभर सोसायटी सदस्यांना कर भरण्याची सुविधाही उपलब्ध होते आणि पालिकेच्या उत्पन्नातही भर पडत असते.

[jwplayer XLvoAWmR]

सोसायटीतील प्रत्येक सदस्याला सोसायटीत वावरत असताना सुरक्षेची भावना वाटावी आणि एक समाधानाची भावना निर्माण व्हावी यासाठी सोसायटीचे सदस्य विशेष काळजी घेताना दिसतात. सोसायटीत एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्यामुळे सोसायटीच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे सोसायटीच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवता येते. तसेच सोसायटीत प्रवेश करण्यासाठी एक तर सोसायटीबाहेर पडण्यासाठी एक असे दोन वेगळे दरवाजे असल्याने सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेता येते. तशी अधिकृतपणे प्रत्येक व्यक्तीची नोंदही केली जाते. तसेच इंटरकॉमची सुविधा उपलब्ध असल्याने सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाला नक्की कुणाला भेटायचे आहे त्याचीही शहानिशा केली जाते. त्यामुळे अपप्रवृत्ती आणि सोसायटी सदस्यांच्या ओळखीशिवाय इतर कुणालाही आत प्रवेश मिळत नाही. तसेच चारही इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर लोखंडी दरवाजा लावण्यात आला असल्याने रात्रीच्या वेळी लिफ्टशिवाय इमारतीत प्रवेश करता येत नाही. या सर्व सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे सोसायटीत चोरीच्या किंवा इतर अप्रिय घटना सहसा घडत नाहीत. त्यात सोसायटीतील सदस्यही एका कुटुंबाप्रमाणे राहत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत नाहीत.

आपत्कालीन परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रेही ठेवण्यात आली आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार पाहता जनरेटरची सुविधाही वसाहतीत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत असते.

तरणतलाव आणि हिरवळ

स्वामी देवप्रकाश गार्डन सोसायटीत तरणतलाव सोसायटीची शोभा वाढवतो. रोजच्या धकाधकीच्या दिनक्रमात तरणतलावामुळे एक वेगळेच समाधान मिळते. त्यात सोसायटीच्या मध्यभागी असलेले क्लब हाऊसही सोसायटीच्या सौंदर्यात भर घालते. तसेच सोसायटीच्या केंद्रस्थानी एक आकर्षक उद्यान तयार करण्यात आले आहे. विविध फुलांच्या आणि सजावटीच्या झाडांमुळे उद्यानाची शोभा वाढते. मोठय़ा झाडांमुळेही वातावरण पोषक राहण्यास मदत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami devprakash gardens in ambernath
First published on: 29-08-2017 at 03:46 IST