पीटीआय, नवी दिल्ली/कोलकाता
बंगळूरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी पश्चिम बंगालमधून सूत्रधारासह दोन मुख्य संशयितांना अटक केली. या घटनेनंतर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपदरम्यान शाब्दिक युद्ध सुरू झाले.
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालचे रूपांतर ‘दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थाना’त केले आहे असा आरोप भाजपने केला, तर राज्यातील पोलिसांनी तातडीने कारवाई केल्यामुळे संशयितांना अटक करण्यात आली, असे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुस्सविर हुसैन शाजिब अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ते कोलकात्याजवळ लपलेल्या ठिकाणाहून त्यांना पकडण्यात आले, ते खोटी ओळख धारण करून लपले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>>“भारताची आण्विक शस्त्रास्रे नष्ट करण्याचा कट”, पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर आरोप
या दोघांपैकी ताहा हा स्फोटाची योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामागील सूत्रधार होता आणि शाजिबने कॅफेमध्ये ‘आयईडी’ ठेवले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एनआयए’, केंद्रीय गुप्तहेर संस्था आणि पश्चिम बंगाल, तेलंगण, कर्नाटक व केरळ या राज्यांचे पोलीस यांच्या समन्वयाने दोघांना अटक करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
बंगळूरुमधील आयटीपीएल मार्ग, ब्रुकफील्ड येथे स्थित असलेल्या लोकप्रिय आणि वर्दळीच्या रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी आयईडी स्फोट झाला होता. त्यानंतर ३ मार्चला ‘एनआयए’ने याचा तपास आपल्या हाती घेतला आणि दोन संशयितांबद्दल माहितीसाठी १० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. शुक्रवारी दोघांना अटक करण्यात आली.
हेही वाचा >>>“डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी संविधान संपवू शकत नाहीत”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान
रामेश्वरम कॅफे स्फोटप्रकरणी ‘एनआयए’ने मुस्सविर हुसैन शाजिब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा या दोन संशयितांना अटक केली. हे दोघेही शिवमोगा येथील ‘आयसिस’ सेलचे सदस्य असू शकतात. दुर्दैवाने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान झाले आहे.- अमित मालवीय, भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख
बंगाल सुरक्षित नाही असे भाजपचा एक नेता म्हणाल्याचे ऐकले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर दोन तासांच्या आत संशयितांना अटक करण्यात आली. तुमची सत्ता असलेल्या राज्यांचे काय?- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री प. बंगाल