ठाणे शहरातील अ‍ॅथलेटिक्सपटूंना पावसाळ्यातही सराव करता यावा, यासाठी दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहाच्या मैदानात सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७० लाखांचा निधी मिळणार आहे तर उर्वरित ३७ लाख रुपयांचा निधी महापालिका देणार आहे. यामुळे गेले अनेक वर्षे तांत्रिक अडचणींमुळे प्रतीक्षेत असलेला सिंथेटिक ट्रकचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहातील मैदानात पावसाळ्यात पाणी साचते. यामुळे मैदानात चिखल होत असल्याने अ‍ॅथलेटिक्सला सराव करता येत नव्हता. याव्यतिरिक्त सरावासाठी दुसरीकडे सोय उपलब्ध नसल्याने अनेक क्रीडापटूंना मुंबईत सरावासाठी जावे लागते. क्रीडापटूंची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी सिंथेटिक ट्रकची मागणी केली होती. याच पाश्र्वभूमीवर झालेल्या एका बैठकीत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी इतर खेळाडूंना अडचण होणार नाही, असा सिंथेटिक ट्रक तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार या कामासाठी महापालिकेने एक कोटी सात लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. या कामाच्या खर्चासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा म्हणून जिल्हा नियोजन विभागापुढे आमदार डावखरे यांनी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी मान्यता दिली असून या कामासाठी ७० लाखांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित ३४ लाखांचा निधी महापालिका देणार आहे.