tv18केक, कॉफी, पेस्ट्री आणि ब्रेड या खाद्यपदार्थाच्या दर्जेदार चवीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ब्रँडशी कल्याणातील विभा पालशेतकर यांच्या ‘द फर्नेस’ हा लोकल कॉफी शॉप सध्या स्पर्धा करत आहे. प्रत्येक खाद्यपदार्थ वैशिष्टय़पूर्ण बनवायची ही फर्नेसची खासियत आहे. त्यामुळेच कल्याण परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या गोदरेज हिल या उच्चभ्रूंच्या परिसराची वेस ओलांडून ‘द फर्नेस’ने कल्याणमधील चवीने खाण्यापिणाऱ्यांना अनेकांना कॉफीच्या कपाकडे खेचण्यात यश मिळवले आहे.
कल्याण शहरातील शहरीकरणाचा वेग वाढला असला तरी आंतराष्ट्रीय ब्रॅण्डस्चे रेस्ट्रॉरन्ट आणि कॉफी शॉप्सनी या भागात फारसे जाळे विणलेले नाही. या आघाडीवर कल्याण हे शहर अजूनही भूतकाळात रमणारे आहे. बडय़ा मॉलमध्ये दिसणाऱ्या या खाद्यपदार्थाच्या साखळ्या कल्याणात सुरू होण्यास फारशा उत्सुक नव्हत्या. नेमकी हीच संधी हेरून व्यवसायाने न्युट्रिशियन असलेल्या विभा पालशेतकर यांनी ‘द फर्नेस’ या कॉफी शॉपची सुरुवात केली.मूळच्या गोव्याच्या असलेल्या विभा यांचे कल्याणच्या डॉ. योगेश पालशेतकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या कल्याणकर झाल्या. गोव्यामध्ये राहिल्याने चॉकलेट, कॉफी आणि परदेशी खाद्यपदार्थाबद्दल त्यांच्या मनात कमालीचे आकर्षण होते. घरामध्ये असे पदार्थ बनवण्याकडे त्यांचा कल होताच. या आवडीतून त्यांनी घरगुती केक्स बनवण्यास सुरुवात केली. या आवडीचे व्यवसायात रूपांतर होण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी दादरच्या कॅटरिंग महाविद्यालयात खाद्यपदार्थ बनवण्याचे शास्त्रोक्त अभ्यासक्रम पूर्ण केला. आपण तयार करत असलेले खाद्यपदार्थ हे आंतराष्ट्रीय दर्जाचे असावेत यासाठी त्यांनी परदेशी खाद्य संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने स्पेनची निवड केली.

खाण्यापूर्वी पहा
‘द फर्निस’ शॉपमध्ये तयार होणारा पदार्थ बनवत असल्याची प्रक्रिया ग्राहकांना आपल्या डोळ्यांनी पाहता येते. ग्राहकाकडून मागणी आल्यानंतर तो पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली जात असून काचेच्या भिंतीतून ही प्रक्रिया पाहता येते. ब्रेड, पेस्ट्री, कॉफी आणि केकसुद्धा मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिला जातो. या शॉपमध्ये मसाला, बॉव्हान, व्हाइट, हॉट डॉ, चिझ, गार्लिक आदी २५ प्रकारचे ब्रेड इथे मिळतात.