एका विवाहितेच्या घरात बळजबरीने शिरून तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शिक्षकाला कल्याण न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. कादरी यांनी तीन महिन्यांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दहा वर्षांनंतर लागलेल्या या निकालामुळे पीडित विवाहितेला न्याय मिळाला आहे.
कल्याण (पूर्व) भागात मुसा लालभाई तांबोळी हा शिक्षक खासगी शिकवणी घ्यायचा. त्याच्याकडे पीडित तरुणी खासगी शिकवणीसाठी यायची. या तरुणीचा नंतर विवाह झाला.
मुसाने या विवाहानंतरही या विद्यार्थिनीच्या घरी येणे-जाणे ठेवले. एक दिवस घरात कोणी नसताना मुसा याने विवाहितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मुसा विरुद्ध विवाहितीने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.तब्बल नऊ वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कल्याण न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. या प्रकरणी दंडाचे दहा हजार रुपये पीडित विवाहितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात अ‍ॅड. रेश्मा जाधव यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.