राज्यासह देशभरात स्वाइन फ्लूने थैमान घातलेला असतानाच सोमवारी ठाणे शहरात स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या महिनाभरात शहरामध्ये स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण सापडले आहेत. याच पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी शहरातील खासगी रुग्णालय डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना स्वाइन फ्लूची साथ पसरू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्वाइन फ्लूची लागण झालेले रुग्ण कसे ओळखावेत आणि त्यांच्यावर कशा प्रकारे उपचार करावेत, यासंबंधीची मार्गदर्शक सूचना सुमारे साडेतीनशे खासगी रुग्णालयांना ऑनलाइनद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
गेल्या महिनाभरापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडू लागले असून, ठाणे शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन कल्याण, एक मिरा-भाईंदर, एक मुलुंड आणि उर्वरित ३० ठाणे शहरातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३४ पैकी तीन रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला असून त्यामध्ये कल्याण, मिरा-भाईंदर आणि ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरामध्ये सोमवारी दिवसभरात स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण सापडले असून, त्यापैकी आठ ठाणे शहरातील, तर दोघे कल्याणचे रहिवासी आहेत. या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याच पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांची आरोग्य विभागाने बैठक घेतली.
सतर्कतेचे आदेश
स्वाइन प्लूची साथ पसरू नये म्हणून प्रशासनाने सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी दिले आहेत. महापालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी स्वाइन फ्लूचे निदान करण्यासाठी आवश्यक तपासणी साहित्य (किट), औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र दिले आहे.