खड्डेविरहित पुलावरून जाताना प्रवासी समाधानी

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल दोन दिवस रस्ते मजबुतीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता. मंगळवारी रात्री अकरा वाजता रस्ते मजबुतीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पाच वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली रेल्वे मार्गावरील पूल आणि रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर या रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे बुजविण्याचे काम कल्याण-डोंबिवली पालिकेकडून केले जात होते. ठाकुर्ली पुलावरील वाहनांची सततची वर्दळ आणि पुलावर पडणाऱ्या खड्डय़ांमुळे सतत वाहन कोंडी, दुचाकी घसरणे असे प्रकार सतत घडत होते. रेल्वे मार्गावरील रस्ते मजबुतीचे काम रेल्वे प्रशासनाने करावे म्हणून पालिका आयुक्तांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला कळविले. त्याची दखल रेल्वेने घेतली नाही.

पुलावरील रस्ता खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने अखेर पालिकेने ठाकुर्ली पुलावरील रस्ते मजबुतीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला. पुलावरील रस्ते किमान दोन ते तीन वर्षे खराब होऊ नयेत. मुसळधार पाऊस पडला तरी या रस्त्यावर खड्डे पडू नयेत म्हणून मास्टेक अ‍ॅस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय शहर अभियंता सपना कोळी यांनी घेतला. पुलाच्या कामातील सुमारे सात ते आठ लाखांचा निधी शिल्लक होता. त्या निधीतून हे काम करण्याचे ठरले. वाहतूक विभागाच्या सहकार्याने पूल बंद करण्याचा निर्णय घेऊन सोमवार-मंगळवारी ठाकुर्ली पुलावरील रस्ते मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी मागील दोन दिवस ३० कामगार काम करत होते. डांबर सपाटीकरण यंत्र, डांबरवाहू डम्पर अशी यंत्रणा रात्रीच्या वेळेत        ठाकुर्ली पूल भागात तैनात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीचा खडबडीतपणा नाहीसा झाल्याने वाहनचालक, प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. मास्टेक अ‍ॅस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर कोपर रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्यावर करण्यात येत आहे. पूल बंद न ठेवता रात्रीच्या वेळेत पुलावर गुळगुळीत रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. कोपर, ठाकुर्ली पुलावरील रस्ते सुस्थितीत, मजबूत केल्याने या पुलांवर किमान दोन वर्षे ते तीन वर्षे खड्डे पडणार नाहीत आणि दोन्ही पूल कोंडी मुक्त राहतील असा विचार करून ही कामे केली आहेत, असे शहर अभियंता कोळी यांनी सांगितले.