tv11फेसबुकवर एखादी पोस्ट एखाद्या मित्राला ‘टॅग’ केली की त्याच्या ‘लाइक’ वाढत जातात.. त्यामुळे ‘टॅग’ करून आपल्या ‘लाइक’ वाढविणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र, फेसबुकप्रेमींपेक्षा वेगळा टॅग एक ठाणेकर कलावंतांनी सुरू करून ठाण्यात एक चांगला उपक्रम गेली चार वष्रे करीत आहेत. या ‘टॅग’ने आता वेगवेगळे गंध सुरू केले असून यातील नाटय़गंध या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वालाही सुरुवात झाली आहे. तर मराठी भाषा दिनापासून काव्यगंध सुरू होत असून चित्रगंध, स्वरगंध, नृत्यगंध सुरू झाले आहेत. ठाण्यातील कलाकार आपली पदरमोड करून हे उपक्रम राबवत आहेत. अगदी फेसबुकच्या भाषेत सांगायचे तर हे गंध शेअर करावेत किंवा ठाणेकरांनी भरभरून ‘लाइक’ करावेत अथवा आपल्या मित्राला ‘टॅग’ करावेत असे नक्की आहेत.
नाटय़, चित्रपट, चित्रकला, दूरचित्रवाहिनी, मालिका, संगीत, नृत्य आणि साहित्य आणि संबंधित इतर क्षेत्रांत काम करणारे ठाण्यातील कलावंतांनी एकत्र येऊन ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (tag) ‘टॅग’ ही संस्था सुरू केली. या संस्थेचे अध्यक्ष आहेत अशोक नारकर तर आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने, गिरीश मोहिते, जयंत पवार, अभिनेता मंगेश देसाई, उदय सबनीस आणि शशी करंदीकर यांच्यासारखी नामवंत मंडळी या संस्थेच्या कार्यकारिणीत आहे तर अन्य चारशे कलावंत या संस्थेचे सभासद आहेत.
या संस्थेतर्फे गेले वर्षभर ‘नाटय़गंध’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचे आता दुसरे पर्व सुरू झाले आहे. जी नाटके प्रायोगिक रंगभूमीवर गाजतात अशा नाटकांचे प्रयोग दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मिनी थिएटरमध्ये करण्यात येतात, यासाठी सुमारे अडीचशे सभासद आजीव स्वरूपात करून घेण्यात आले असून काही तिकिटे अत्यल्प दरात त्या वेळी उपलब्ध करून देण्यात येतात. यामध्ये नाटय़ परिषद, राज्य नाटय़ स्पर्धा आणि ‘आयएनटी’सारख्या स्पर्धामध्ये गाजलेल्या नाटकांचे प्रयोग या ‘नाटय़गंध’मध्ये करण्यात येत असून त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे. अर्थात त्याला होणारा खर्च ही संस्था आणि त्यातील कलाकार पदरमोड करून करीत आहेत. तर ‘चित्रगंध’ या उपक्रमातून दर महिना एक परदेशी चित्रपट दाखविण्यात येतो. तर ‘काव्यगंध’ ला मराठी भाषा दिनापासून सुरुवात होते आहे तर ‘स्वरगंध’ला मूर्त स्वरूप आले आहे.
आम्ही ठाण्याचे आहोत, आम्ही ठाण्यातून मोठे झालो, त्यामुळे आता ठाण्यासाठी काही तरी करू या या भावनेतून हे कलावंत एकत्र आले आहेत. त्यामध्ये नाटकाच्या आणि चित्रपटाच्या तांत्रिक बाजू सांभाळणारी मंडळी आहे, तशीच चित्रकार विजयराज बोधनकर यांच्यासारखी नामवंत मंडळी आहे. एरवी प्रसिद्धीच्या झोतात असणारी ही मंडळी गेली तीन-चार वष्रे हा उपक्रम राबवित आहेत पण प्रसिद्धीसाठी धडपड न करता हे सुरू आहे. एरवी मानधन घेतल्याशिवाय कार्यक्रम न करणारी मंडळी या व्यासपीठावर सामाजिक जाणिवेतून एकत्र येतात. आपली वेळ देतात. एरवी एकमेकांशी व्यावसायिक स्पर्धा करणारी ही मंडळी सर्व स्पर्धा बाजूला ठेवून व्यावसायिक संधी शेअर करतात. नेटाने एकत्र येऊन काम सुरू आहे. आता त्याला ठाणेकरांनी खुल्या दिलाने प्रतिसाद दिला तर काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरमध्ये सुरू असलेले हे उपक्रम काशिनाथ घाणेकर किंवा गडकरींच्या मुख्य सभागृहातही साजरे होऊ शकतात. त्याला साथ हवी आहे ती ठाणेकरांच्या सर्वार्थाने सहकार्य, मदत आणि प्रतिसादाची.
प्राची