भरधाव दुचाकी चालवून चार जणांना जखमी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या अल्पवयीन दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या विष्णुनगर पोलिस ठाण्यातील हवालदार कडू यांची वरिष्ठांनी कानउघाडणी केली. बुधवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यातून तक्रारदारांना बोलवण्यात आले. त्यांच्याकडून कागदपत्र जमा करून गुन्ह्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान भागात वीस दिवसापूर्वी एका दुचाकीस्वाराने सविता यावलकर, सुनेत्रा वरूरकर, स्वरांगी यावलकर या महिला व एक लहान मुलाला ठोकर दिली होती. दुचाकीवर तीन तरुण बसून सुसाट वेगाने जात होते. दुचाकीची ठोकर बसल्याने स्वरांगीच्या पायाचे हाड मोडले. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. दोन महिला, मुलाला डोके, पाठीला दुखापत झाली. याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हवालदार कडू यांनी तक्रारदारांना नव्याने पंच आणा, दुचाकीस्वार अल्पवयीन आहे. त्याला अटक करता येत नाही, अशी कारणे देऊन गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ चालवली होती. अपघात होऊनही पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याने तक्रारदार तीव्र नाराज होते. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच तक्रारदारांना बोलावून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरफोडीच्या चार घटना
ठाणे: येथील वसंतविहार भागात राहणाऱ्या शकुंतला पद्मनाभ शेट्टी (६९) यांच्या घरी ७ ते १४ फेब्रुवारी कालावधीदरम्यान चोरी झाली. या चोरीप्रकरणी शेट्टी यांच्या घरी कामावर असलेल्या प्रफुल वासुदेव भुर्के याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याने दोन लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर रोड येथील विजय गार्डन परिसरात राहणारे प्रयत्न भिकू मणेरा (३७) यांच्या घरी बुधवारी चोरी झाली. त्यांच्या घराचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरटय़ाने सोन्याचे दागिने आणि रोख असा ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली येथील नाना शंकर शेठ रोड भागात राहणारे कमलाकर दामोदर वैद्य (७०) यांच्या घरी मंगळवारी चोरी झाली. त्यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून चोरटय़ाने सोन्याचे दागिने, रोख, लॅपटॉप, कॅमेरा असा ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ येथील कानसई परिसरात राहणाऱ्या मनीषा शैलेश कांबळे (३५) यांच्या घरी बुधवारी चोरी झाली. त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ाने २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृतीयपंथींनी सोनसाखळी खेचली
ठाणे: कल्याण येथील हिराबाग परिसरात राहणारे रिकीन केतन गज्जार (२०) आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खारेगाव मार्गे कल्याणला जात होते. त्या वेळी रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या दोन तृतीयपंथींनी त्यांची दुचाकी अडवली आणि रिकीनच्या गळ्यातील ३७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने खेचली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खारकर आळी परिसरात राहणाऱ्या शारदा द्वारकानाथ गुप्ता (४९) बुधवारी त्यांच्या भाच्यासोबत पोलीस कवायत मैदानाशेजारील रस्त्यावर सकाळी चालण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी गुप्ता यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचली. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण येथील पारनाका परिसरात राहणाऱ्या स्मिता चिंतामणी फडणीस (६९) या सोमवारी गणपती मंदिराजवळून पायी जात होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले.
होली एंजल्स शाळेचा शिपाई बेपत्ता
डोंबिवली: येथील होली एंजल्स शाळेत शिपाई म्हणून काम करणारा नरेश काठे हा तरुण गेल्या आठवडय़ापासून बेपत्ता आहे. २९ एप्रिलला त्याच्या विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. कोणाशीही वाद नसताना अचानक नरेश बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याची दुचाकी, मोबाइल नासधूस केलेल्या अवस्थेत पूर्व भागातील अग्निशमन दलाच्या कार्यालय रस्त्यावर सापडली आहे. गेल्या आठवडय़ात नरेश शाळेत जाण्यासाठी नेहमीप्रमाणे निघाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. म्हणून कुटुंबीयांनी शाळेत चौकशी केली. तो शाळेत आला नसल्याचे सांगण्यात आले. मानपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या अग्निशमन दल कार्यालय परिसरात नरेशची दुचाकी, मोबाइल मोडतोड केलेल्या स्थितीत आढळून आला. लग्नाच्या तयारीत तो व्यस्त होता, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात येते.