ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांकडून बुधवारी झालेल्या मारहाणीच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरत या संपूर्ण परिसरातील अतिक्रमणे, बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली. माळवी यांना मारहाण करणाऱ्या गावदेवी भागातील एकाविरा पोळी भाजी केंद्राच्या मालकाच्या गाळ्यासह आसपासचे २५हून अधिक गाळे या कारवाईत प्रशासनाने जमीनदोस्त केले. या कारवाईदरम्यान भलतेच आक्रमक झालेले जयस्वाल यांनी काही रिक्षा संघटनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकाविल्याने या भागातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. जयस्वाल यांच्या अंगरक्षकांनीही काही रिक्षाचालकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने संतापलेल्या रिक्षा संघटनेने गुरुवारी सायंकाळपासून बंदचे हत्यार उगारले. त्यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी तसेच राम मारुती रोड परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार केली आहेत. बुधवारी महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांचे पथक गावदेवी भागात कारवाई करीत होते. त्या वेळेस तेथील एकविरा पोळी भाजी केंद्राचे मालक प्रवेश देशपांडे यांच्यासह १० ते १५ जणांनी त्यांना मारहाण केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. माळवी यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या याच भागातील एकविरा पोळी भाजी केंद्राच्या मालकाचा गाळा सील करण्याचे आदेश आयुक्तांनी सकाळी घेतलेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास हा गाळा सील करण्यात आला.
या कारवाईनंतर महापालिकेचे पथक माघारी परतत होते. त्याच वेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे पोलीस आणि महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले. माळवी यांच्यावरील हल्ल्यामुळे कमालीचे संतापल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. काही वेळातच ते अचानक आक्रमक झाले आणि तेथील गाळे जमीनदोस्त करण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने या भागातील गाळे एकामागोमाग एक पाडण्यास सुरुवात केली. रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे या गाळ्यांमध्ये पुनवर्सन करण्यात आले होते. तसेच गाळ्यांमध्ये अनेकांचे साहित्य होते. त्यामुळे या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या काही जणांनी गाळे तोडू नका, अशी विनंती पालिकेला केली. मात्र, जयस्वाल कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
ही कारवाई संपत नाही तोच आयुक्तांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यांच्या दिशेने वळविला. मन मानेल तशा रिक्षा उभ्या असल्याचे पाहून त्यांनी रिक्षाचालकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या वेळी काही रिक्षाचालक त्यांच्याशी वाद घालू लागताच यापैकी एकाला जयस्वाल यांच्या अंगरक्षकाने बेदम चोप दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. हा प्रकार सुरू असताना राष्ट्रवादी रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष राजू सावंत यांनी या प्रकारास हरकत घेतली असता सावंत यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करत रिक्षाचालकांनी ऐन सायंकाळी काही काळ रिक्षा बंदचे हत्यार उपसल्याने प्रवाशांचे हाल झाले.