‘ब्रॅड ठाणे’साठी महापालिकेचा पुढाकार

तलावांचे शहर अशी काल-परवापर्यंत ओळख मिरवणाऱ्या ठाण्याला एक नवा चेहरा मिळवून देण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे. ठाणे शहराला तलाव, खाडी किनारा आणि हिरवेगार जंगल लाभले आहे. या तिघांची अशी एक रंगसंगती निश्चित करण्यात आली असून, शहरातील पदपथ, दुभाजक, महापालिकेच्या इमारती, नाटय़गृह, रुग्णालये, शाळा, चौक याच रंगसंगतीने नटतील अशी ही योजना आहे. या ब्रॅड ठाण्याचा पहिला प्रयोग नव्यानेच रुंदीकरण करण्यात आलेल्या पोखरण रस्त्यावर केला जाणार आहे.

ठाण्यात प्रवेश करताच या शहराची ही वेगळी ओळख प्रस्थापित व्हावी यासाठी महापालिकेने ‘बॅड्र ठाणे’ ही संकल्पना तयार केली असून यासंबंधीची अधिकृत घोषणा महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या संकल्पनेनुसार एक बोधचिन्ह तयार केले जाणार असून तो तयार करण्यासाठी ऑनलाइन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेतून जो स्पर्धक यशस्वी होईल त्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषीक दिले जाईल, अशी घोषणा आयुक्त जयस्वाल यांनी केली.

ठाण्याला तलाव, खाडी किनारा आणि हिरवागार निसर्ग लाभला आहे. महापालिकेने ठरविलेल्या रंगसंगतीत या तिन्ही वैशिटय़ांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ‘अ‍ॅक्वा ब्लू’ हा रंग प्राधान्याने ठरवण्यात आला असून त्यासोबत हिरवा आणि पिवळा अशी रंगसंगती निश्चित करण्यात आली आहे. शहरातील पदपथ, बसस्थानके, विजेचे खांब, कचरा पेटय़ा तसेच एटीएम सेंटर, बायो टॉयेलट, विविध प्रकारचे वृक्ष, एलईडी लाईट अशा सार्वजनिक ठिकाणी या रंगसंगतीचा वापर केला जाणार आहे. याशिवाय शहरातील ठरावीक मोकळ्या जागा, िभती वारली चित्रकला तसेच कलाकृतींनी सजविल्या जाणार असून त्यासाठी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट, रचना, रहेजा अशा विविध कलासंस्था, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

इमारतींना एक रंगसंगती

शहरात नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांमध्ये या रंगसंगतीचा वापर केला जावा, असा आग्रह धरण्यात येणार असून नामवंत बिल्डरांनी त्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा या वेळी जयस्वाल यांनी केला. इमारतींचे रंग निवडण्याचा अधिकार संबंधित रहिवासी, बिल्डर तसेच गृहसंकुलांना असला तरी शहराची ओळख ठरु शकेल अशा पद्धतीने बोधचिन्हे अथवा रंगसंगतीचा वापर एखाद्या कोपऱ्यात तरी करावा अशी विनंती करण्यात आली आहे.