ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. माणुसकीला काळीमा फासण्याचे ज्यांनी काम केले. ज्यांनी आमच्या लाडक्या बहिणींचे कुंकु पुसण्याचे काम केले. त्यांना धडा शिकविल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पाकिस्तानला मोदी सोडणार नाही असेही शिंदे म्हणाले.
काश्मीर येथे पेहलगामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निर्दोष पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पर्यटकांचा बळी गेला. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी अनेकजण करत आहेत. आज, बुधवारी माॅकड्रील होणार होते. त्यापूर्वीच पहाटेच्यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अतिरेक्यांचे पाकिस्तानातील तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर आता भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी ठाण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या देशातले निष्पाप, बेकसुर पर्यटक पेहलगामला गेले होते. आपल्या मुली, आपल्या आया-बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचे कुंकु पुसण्याचे काम अतिरेक्यांनी केले. त्यांच्या कर्त्या पुरुषांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्याचे पाप ज्यांनी केले. माणुसकीला कालीमा फासण्याचे काम ज्यांनी केले. त्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जशास तसे उत्तर देतील हे आम्ही आधीच सांगत होतो.
आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचे, मुलींचे कुंकू पुसण्याचे पाप केले त्यांना धडा शिकविला आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच देशवासियांना न्याय मिळाला आहे. सर्व भारतीयांची छाती गर्वाने फुगली आहे. पाकिस्तानला मोदी सोडणार नाही असेही शिंदे म्हणाले.