ठाण्यातील गावदेवी मैदानात सध्या भरलेला धान्य महोत्सव अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. याठिकाणी तुम्हाला विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतात सेंद्रिय खताद्वारे पिकवलेले धान्य कमी दरात मिळू शकते. राज्याचे पणनमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते गुरूवारी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या ४ मेपर्यंत गावदेवी मैदानावर हा महोत्सव सुरू असेल. या बाजारात साडेतीनशे किलोमीटर अंतर कापून गणेश कराळे हा शेतकरी हिंगोलीवरून आला आहे. आपल्या धान्याला चांगला भाव मिळावा या आशेने गणेश कराळे हळद आणि ज्वारी घेऊन याठिकाणी पोहचला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडील शेती मालाला चांगला भाव मिळाला असून त्याला चांगला नफाही झाला आहे.
ठाण्यातील या धान्य महोत्सवाच्या माध्यमातून धान्य आणि कोकणातील आंबे ठाणेकरांच्या भेटीला आले असतानाच दुसरीकडे कुठे तरी सरकारने जर अशाप्रकारच्या बाजारपेठा ठिकठिकाणी सुरु झाल्या तर नक्कीच भविष्यात देखील स्वस्त धान्य मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.