tm02 tm01
ठाणे हे तलावांचे शहर मानले जाते. मात्र त्याबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांबाबतही शहराला विशेष ओळख आहे. गेल्या  तीस-चाळीस वर्षांत ठाणे शहर कैकपटींनी वाढले. नाटय़, संगीत आदी कलांच्या आविष्कारांमध्येही बरेच बदल झाले. मासुंदा तलावाकाठचे गडकरी रंगायतन  त्या सर्व बदलांचा साक्षीदार आहे. गेल्या पिढीतील अभिजात संगीत नाटकांपासून आताच्या सुटसुटीत दोन अंकी ‘पॉप कॉर्न’छाप नाटकांपर्यंतच्या बदलास हे नाटय़गृह साक्षीदार आहे. गडकरीच्या आधी आणि नंतरही महाराष्ट्रात अनेक नाटय़गृहे बांधण्यात आली. मात्र त्यांना गडकरी रंगायतनची सर नव्हती. त्यामुळेच शासनातर्फे काही निवडक शहरात बांधण्यात येणाऱ्या नाटय़गृहांसाठी गडकरीचीच रचना प्रमाणभूत ठरविण्यात आलीे. ठाणे शहराची ठळक खुण असलेल्या या वास्तूचे तीस वर्षांपूर्वीचे छायाचित्र आणि सध्याचे छायाचित्र पाहिले तर ठाणे कितीही वाढले तरी ‘गडकरी’ची उंची कमी झालेली नाही, हे दिसून येते.