शिवसेनेचा प्रतिहल्ला

ठाणे महापालिकेत दलाल आणि बिल्डरांचे राज्य असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना शिवसेनेने मंगळवारी उत्तर दिले. पालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची ‘युती’ झाल्याचा आरोप करतानाच, भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पीत असल्याचा टोला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. ‘सकाळी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड एक आरोप करतात आणि तोच आरोप त्याच शब्दात रात्री मुख्यमंत्र्यांच्या तोंडी असतो हा काही योगायोग नाही,’ असे शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तसेच महापालिका हा दलालांचा अड्डा झाल्याचे सांगून आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर हल्ल्याची योजना होती, असा गौप्यस्फोट केला होता. त्याला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, हे करताना शिंदे यांनी ठाण्यातील अनेक कामांचे श्रेय राज्यातील आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला देऊन टाकले!

ठाण्यात क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना घेण्यात आला. ठाण्यासाठी ‘एसआरए’ योजना राबविण्याची अधिसूचना ११ सप्टेंबर २०१४ रोजी निघाली. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील तीन उड्डाणपुलांच्या कामांच्या निविदा महापालिकेने सप्टेंबर २०१४ मध्ये काढल्या. त्यावेळी मुख्यमंत्रिपदी फडणवीस नव्हते, असे दाखले िशदे यांनी यावेळी दिले. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांना मंजुरी मिळविण्यासाठी शिवसेनेने आंदोलने केली, अशी पुस्ती जोडायला ते विसरले नाहीत. सध्या कचराभूमी, मलनि:सारण, पाणीपुरवठा अशा मुद्दय़ावरून आमदार जितेंद्र आव्हाड हे शिवसेनेवर टीका करीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी सध्या आव्हाडांचे शब्द दिसत असून ठाणेकरांच्या नजरेतून हे साटेलोटे सुटणार नाही, असे िशदे यावेळी म्हणाले.

जयस्वाल धमकीप्रकरणी नावे जाहीर करा

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना धमकी दिली जात असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. मग, त्यांच्या विभागाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला धमकी येत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल करत गृहखाते अपयशी ठरल्याचे हे उदाहरण आहे, असा टोला यावेळी लगावला.

कल्याण-डोंबिवलीकरांची फसवणूक

सत्तेवर येण्यापूर्वीच प्रकल्पांना निधी दिला, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर सत्तेवर असताना दीड वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेले साडे सहा हजार कोटींचे पॅकेज अद्याप का दिले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिव्याला एमएमआरडीए दत्तक घेणार असेल तर तेथून निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी काय कामे करायची, असेही ते म्हणाले.