ठाणे कारागृहात असणाऱ्या कैद्यांसाठी कारागृहाच्या आवारातच ग्रंथालय उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम कारागृह अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. महिला कैद्यांसाठी तयार केलेल्या या ग्रंथालयाचे उद्घाटन सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस. बी. पाटील, महिला तुरुंगाधिकारी अश्विनी मंडपे आदी उपस्थित होते.
दिवसभर आजूबाजूला नीरव शांतता, वेळ घालविण्यासाठी इतर कोणतीही साधने नाहीत. त्यामुळे किमान वाचनाच्या माध्यमातून कैद्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी महिला तुरुंगाधिकारी अश्विनी मंडपे यांच्या पुढाकाराने कारागृहातील महिला कक्षाच्या आवारात महिलांसाठी ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. रोटरी क्लब आणि मदर्स सामाजिक संस्था यांच्यातर्फे काही पुस्तके ग्रंथालयाला भेट देण्यात आली आहेत. सध्या ग्रंथालयात विविध विषयांच्या ५०० पुस्तकांचा संग्रह आहे. कारागृहातील चाकोरीबाहेर जाऊन अधिकाऱ्यांनी कैद्यांना ग्रंथालयासारखे माध्यम खुले करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कारागृह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वाचनातून प्रगल्भता येते, याची आठवण करून देत जिल्हाधिकाऱ्यांनी कैद्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीची आठवण करून दिली. वाचनामुळे जीवनात स्थैर्य निर्माण होते. आयुष्याच्या अवघड काळात वाचनाची गरज असते, असेही त्यांनी सांगितले. ग्रंथालयासारखेच अनेक स्तुत्य उपक्रम कारागृहात आयोजित करावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल. महिला सुरक्षा कक्षाच्या आवारात कार्यक्रम घेण्याकरिता व्यासपीठ उभारण्यासाठी निधी देण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ग्रंथालयाचा पुरेपूर लाभ घेत सुशिक्षित महिलांनी मैत्रिणींना वाचायला शिकवावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कैदी महिलांच्या आयुष्यातील हा खडतर प्रवास लवकर संपावा, अशी सदिच्छाही डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. या वेळी कैदी महिलांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट देत महिलांसाठी होणाऱ्या योगावर्ग, महिला प्रौढ साक्षरता वर्ग, एफ.एम. सुविधा अशा उपक्रमांचे कौतुक केले. उद्घाटनप्रसंगी एका महिला कैदीने ‘हंबरून वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मला तिच्यामंधी दिसती माझी माय’ या कवितेच्या पंक्ती म्हटल्या. तेव्हा उपस्थितांसह अनेक महिला कैदी भावनाविवश झाल्या होत्या.