ठाण्यातील कळवा-खारेगाव येथील आतकोनेश्वर नगरात खेळणाऱ्या चार वर्षांच्या मुलावर डुकरांनी जीवघेणा हल्ला केला. एका महिलेच्या सतर्कतेमुळे या मुलाचा जीव वाचला. हा मुलगा गंभीर जखमी असून, त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतकोनेश्वर नगरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. परिसरात घराबाहेर खेळणाऱ्या सूरज चंडालिया या चार वर्षांच्या मुलावर मोकाट डुकरांनी जीवघेणा हल्ला केला. मुलगा जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज एका महिलेने ऐकला. तिने मुलाकडे धाव घेतली. तिने हातातील बादली डुकरांच्या दिशेने फेकली. तसेच दगडही मारल्याने डुकरांनी तेथून पळ काढला. महिलेने डुकरांना पिटाळून लावल्याने मुलाचा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया हल्ल्यात जखमी झालेल्या सूरजची आई लक्ष्मी चंडालिया हिने व्यक्त केली. डुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सूरजला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर आहे, असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त न करणाऱ्या महापालिका प्रशासनाविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane kalawa kharegaon pigs attack a four years old boy
First published on: 22-04-2017 at 20:28 IST