ठाणे : ठाणे खाडीच्या पल्याड असलेला कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कचरा समस्येने डोके कर काढले असून जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. यावरूनच सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आंदोलने केली. दरम्यान, या भागात कचरा साठण्यामागचे कारण पुढे आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा मुंब्रा, दिवा, डायघर परिसर येतो. ठाणे खाडीच्या पल्याड असलेला हा परिसर असून येथे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. पालिकेच्या स्थापनेपासूनच या भागाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची टीका सातत्याने होत होती.

या टिकेनंतर पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून येथे सोयीसुविधा पुसविण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी या भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कचरा समस्येने डोके कर काढले असून जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

पालिकेसोमर कचरा टाकला

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा तसेच मुंब्रा परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरीक हैराण झाले असून त्याचबरोबर अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. संबधित अधिकाऱ्यांना सांगूनही कचरा उचलला जात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आक्रमक भुमिका घेतली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पुजा शिंदे- विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.

अभिजीत यांनी कळव्यात जागोजागी साठलेला कचरा एका डम्परमधून भरून पालिका मुख्यालयाजवळ आणला आणि त्यानंतर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच तो कचरा रिकामा केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंब्य्रातील माजी नगरसेवक आणि पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांच्यासह माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

‘या’ कारणामुळे कचरा कोंडी

ठाणे महापालिकेने डायघर भागात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला आहे. पण, या प्रकल्पास स्थानिकांकडून विरोध होत आहे. या विरोधास कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होत असून त्याचबरोबर इतरही करणे आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडवर ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा प्रकल्प तीन ते चार दिवसांपासून बंद आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, डायघरमध्ये कचऱ्याचे ढीग साठले असून ठाणे शहरातही काही ठिकाणी अशीच अवस्था आहे.

पालिकेकडून उपाययोजना

ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डायघरमध्ये निर्माण झालेली कचरा कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासन ग्रामस्थांबरोबर चर्चा करीत आहे. परंतु ग्रामस्थांचा प्रकल्पास विरोध असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.