तब्बल साडेचार कोटींची गुंतवणूक; कासारवडवली हत्याकांडाचे गूढ वाढले
घरातील चौदाजणांची हत्या करून स्वत: आत्महत्या करणारा हसनैन वरेकर याच्या डोक्यावर ६८ लाखांचे कर्ज असल्याची बाब यापूर्वीच उघड झाली असतानाच त्याला शेअरबाजारातील गुंतवणुकीमध्ये तब्बल ४० लाखांचा तोटा झाल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. शेअर बाजारात डिसेंबरअखरेपर्यंत त्याने तब्बल साडेचार कोटी रुपयांची उलाढाल केल्याचेही तपासात समोर आले आहे.
घोडबंदर येथील कासारवडवली गावात महिनाभरापूर्वी हसनैन वरेकर या तरुणाने घरातील चौदा जणांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली होती. या हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याच्या डोक्यावर ६८ लाखांचे कर्ज असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे त्याच्यावर इतके कर्ज होण्यामागची कारणे पोलिसांनी शोधण्यास सुरूवात केली होती. त्यामध्ये हसनैन वरेकर हा शेअर बाजारात नियमित व्यवहार करत असल्याचे समोर आले होते. तसेच त्याने डिसेंबरअखेपर्यंत तब्बल साडेचार कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती उघड झाली होती. मात्र या उलाढालीत त्याला नेमका किती फायदा किंवा तोटा झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नव्हते. यामुळे पोलिसांनी लेखापालांमार्फत(सीए) त्याच्या शेअर बाजारातील डिमॉट खात्याचा लेखाजोखा तपासण्यास सुरूवात केली होती. या तपासामध्ये शेअरबाजारातील गुंतवणुकीमध्ये हसनैनला तब्बल ४० लाखांचा तोटा झाल्याची माहिती पुढे आली आहे, अशी माहिती ठाणे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गुंगीच्या औषधांचे अंश
कासारवडवलीतील हत्याकांडानंतर ठाणे पोलिसांनी सर्व मृतांचे शवविच्छेदन केले होते आणि त्या सर्वाचा विसेरा कलीना येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या तपासणीचा अहवाल नुकताच ठाणे पोलिसांना प्राप्त झाला असून त्यामध्ये हसनैनसह तीनजण वगळता उर्वरित सर्वामध्ये गुंगीचे औषध सापडले आहे. त्यामुळे हत्याकांड करण्यापूर्वी त्याने त्याची तीन महिन्यांची मुलगी उमेरा आणि बहिण बतुल यांना वगळता उर्वरित सर्वाना गुंगीचे औषध दिल्याची बाबही तपासात पुढे आली आहे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.