मोहम्मद रफी आणि किशोर कुमार या पाश्र्वगायकांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतांवर आपल्या स्वरांनी साज चढवला. त्यांची बहुतांश गाणी आजच्या पिढीलाही हृदयाजवळची वाटतात. त्यांच्या आवाजाने बहरलेली गाणी आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. याच गायक द्वयीला स्वरांजली अर्पण करण्यासाठी एमआर एन्टरटेंमेंट्स यांच्या वतीने शुक्रवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतनमध्ये ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ ही सदाबहार मैफील आयोजित करण्यात आली आहे. माजिद खान, स्वाती चौधरी, सीमा चक्रवर्ती, विनयराज हे कलावंत या मैफलीत या दोन्ही गायकांची सदाबहार गाणी सादर करणार आहेत. ‘एफएम गोल्ड’ वरील सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी राशी मोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’कधी- शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी, वेळ-रात्री ८.३०

’कुठे- गडकरी रंगायतन, ठाणे(प.)

 

जर्मनीच्या बीअर महोत्सवाला ठाणे, मुंबईतून ‘चीअर्स’

बीअर म्हटलं की दारूचा एक प्रकार असं सर्रास वर्गीकरण आपल्याकडे केलं जातं. मात्र, आजघडीला पाणी आणि चहानंतर सर्वाधिक प्राशन होणारा द्रवपदार्थ म्हणून बीअरचा क्रमांक लागतो. बीअरचा उगमही ख्रिस्तपूर्व ९५०० सालातील आहे. त्यामुळे सर्वात प्राचीन मानवकृत मद्य म्हणूनही बीअरची ओळख आहे. बीअरच्या या इतिहासातील आणखी एक मानाचे पान म्हणजे गेल्या २०५ वर्षांपासून जर्मनीमध्ये साजरा होणारा ‘ऑक्टोबर फेस्ट’. ‘व्हीट बीअर’ अर्थात गव्हापासून बनवलेल्या बीअरच्या फेसाळत्या चषकानिशी लोककला, संगीताचा आनंद लुटत साजरा केला जाणारा हा ऑक्टोबर फेस्ट यंदा मुंबई-ठाण्यातही अनुभवायला मिळणार आहे.

मुंबई, ठाण्यातील ‘द बीअर कॅफे’ या रेस्टॉरंटतर्फे ऑक्टोबर फेस्टच्याच धर्तीवर ‘ऑक्टोब्रू फेस्ट’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नागरिकांना ‘पॉलेनर ओरिजिनल’, ‘पॉलिनर हेफे वाएसबीअर’, ‘एरडिंगर वाएसबीअर’, ‘एरडिंगर डंकेल’, ‘स्नाइडर विस्सी’ अशा जर्मन व्हीट बीअर चाखायला मिळणार आहेत. पॉलेनर ओरिजिनल, पॉलेनर हेफे वाएसबीअरच्या ४ पाईंटसाठी १९९५ रुपये मोजावे लागणार आहेत. एरडिंगर वाएसबीअरच्या ४ पाईंटसाठी २०९५ रुपये तर एरडिंगर डंकेलच्या ३ बॉटल्ससाठी २०९५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे स्नाइडर विस्सी या बीअरच्या ४ पाईंटसाठी २४९५ रुपये मोजावे लागणार आहेत. या महोत्सवात कॉफीची चव असलेली ‘एरडिंगर डंकेल’ ही बीअर उपलब्ध आहे. बीअरच्या सोबतीला विविध प्रकारचे शाकाहारी आणि मासाहारी खाद्यपदार्थही महोत्सवात उपलब्ध असणार आहेत.

’कधी? : ३१ ऑक्टोबपर्यंत

’कुठे? : द बीअर कॅफे, विवियाना मॉल, ठाणे

 

खरेदी महोत्सव

सणांच्या महिन्यांमध्ये कपडे खरेदी करणे, घर सजवणे, चमचमीत खाद्य पदार्थ बनविणे यासारख्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. हे सर्व करताना बाजारात भरपूर फिरावे लागते. सणांसाठीची आवश्यक खरेदी जर एकाच छताखाली उपलब्ध झाली तर होणारी दगदग आणि पायपीट टळू शकते. यासाठी महिला लघुउद्योजकांनी उत्पादित केलेल्या गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सध्या ठाण्यातील घंटाळी मैदान येथे सुरू असून हे प्रदर्शन येत्या सोमवार पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये देशातील विविध प्रांतातील वस्त्र, खाद्य, सजावटीच्या वस्तू आदी गोष्टी उपलब्ध आहेत.

’कधी- १२ ऑक्टोबपर्यंत, वेळ- सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत

’कुठे- घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, ठाणे (प.)

 

नवरात्रीच्या निमित्ताने गुजराथी पक्वानांची पर्वणी

महाराष्ट्रात नवरात्रौत्सव मोठय़ा धुमधडाक्यात साजरा होत असला तरी शेजारील गुजरात राज्यात हा उत्सव म्हणजे पर्वणीच असते. नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस गुजरातमध्ये दिवाळीसारखेच दणक्यात साजरे केले जातात. त्यानिमित्ताने वेगवेगळय़ा खाद्यपदार्थाची रेलचेल घरोघरी पाहायला मिळते. अशाच पक्वानांनी तुमचा नवरात्रौत्सव तृप्त करायचा असेल तर ठाण्यातील कोरम मॉलमध्ये अवश्य भेट द्या. नवरात्रीच्या निमित्ताने कोरम मॉलतर्फे येत्या बुधवारी गुजराती खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कपकेक ढोकळा, मुठीया, हांडवो, खांडवी अशा अनेक चटकदार पदार्थाचा समावेश आहे. हे पदार्थ तद्दन गुजराती पद्धतीने बनवण्याची कला येथे शिकायला मिळेल. ही कार्यशाळा विनामूल्य आहे.

’कधी- बुधवार, १४ ऑक्टोबर , वेळ- दुपारी ३ ते रात्री ८

’कुठे- कोरम मॉस, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शन जवळ, ठाणे (प.)

 

‘रोल ऑन रॉक’

भारतीय संगीताचे सूर मनाला शांत आणि समाधानाची अनुभूती देतात. तसेच, पाश्चिमात्य संगीत मनाला उत्साह आणि जल्लोषाच्या पातळीवर थिरकायला लावते. भारतीय संगीताला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या संगीताने पाश्चिमात्य संगीताला आपलेसे केले आहे आणि अलीकडे पाश्चिमात्य संगीतानेही भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला सामावून घेतले आहे. रॉक, पॉप, जॅझ, हिपहॉप अशा विविध लोकप्रिय पाश्चिमात्य संगीत प्रकारांबरोबर भारतीय संगीताची अशी एक आगळी मैफल ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील उगम या संस्थेच्या वतीने शनिवारी सुप्रसिद्ध ‘अर्का बॅण्ड’ यांचा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

’कधी- शनिवार, १० ऑक्टोबर रोजी, वेळ-रात्री ८.१५

’कुठे- काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)

 

हद कर दीं आपने.. 

ओम कथारे लिखित हद कर दीं आपने या हिंदी नाटकाचा प्रयोग रविवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे आयोजित करण्यात आला आहे. दोन तरुण मुलांची आई जेव्हा वयाच्या पन्नाशीत गर्भवती होते. तेव्हा समाजात, कुटुंबात, उमटणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रयांचे दर्शन या नाटकातून आपल्याला घडणार आहे. यामध्ये स्वत: लेखक ओम कथारे, आस्था ओरोरा, रोहित शर्मा, प्रियांका कौल, अशोक शर्मा, धर्मेद्र, मुकेश यादव आदींच्या यात भूमिका आहेत.

’कधी- रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रा. ८.३०

’कुठे- काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)

 

पक्ष्यांच्या दुनियेत एक दिवस

सकाळची नीरव शांतता आणि सोबत पक्ष्यांचा किलबिलाट..हेवा वाटावा अशा निसर्गाच्या सान्निध्यात पक्ष्यांची दुनिया पाहण्याची संधी नेचरट्रेल्स या संस्थेतर्फे मिळणार आहे. संस्थेच्या पगमार्क्‍स या उपक्रमाअंतर्गत एकदिवसीय पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ठाण्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले असून येऊरच्या हिरव्यागार टेकडय़ा पर्यावरण प्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आजही मोठय़ा प्रमाणावर वनराई आढळून येते. ठाणे जिल्ह्य़ात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांना पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क- ८८७९३६६१९१

’कधी- रविवार, ११ ऑक्टोबर सकाळी ६.४५ वाजता

’कुठे- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गेट, टिकुजीनी वाडी, ठाणे (प.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane mumbai ciara to germanys beer festival
First published on: 09-10-2015 at 00:50 IST