ठाणे महापालिकेचा स्थानिक संस्था कर थकवणाऱ्या शहरातील १७४ विकासकांना स्थानिक संस्था कर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. अशा विकासकांचा शोध घ्या आणि त्यांच्याकडून कराची वसुली करा, अशा स्वरूपाचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या आठवडय़ात दिले होते. शहर विकास विभागाकडून बांधकामाची परवानगी पदरात पाडून घेताना काही विकासकांनी स्थानिक संस्था कर थकवल्याचा संशय आहे. या कराची मोजदाद कशी करावी, यासंबंधीची यंत्रणाच कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षभरात ठाणे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले आहे. उत्पन्नाच्या आघाडीवर फारशी सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत, त्यामुळे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाच्या बाजूची उद्दिष्टपूर्ती होईल का, याविषयी महापालिका वर्तुळात एकंदरीत साशंकतेचे वातावरण आहे. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी विकासाची नवी स्वप्ने दाखविणारा सुमारे दोन हजार कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आणि सर्वपक्षीय सदस्यांनी त्यात तब्बल ६०० कोटी रुपयांची वाढ सुचवली. सुमारे दोन हजार ७०० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प फारसा वास्तववादी नाही, अशी स्पष्ट भूमिका असीम गुप्ता यांना मांडावी लागली.

स्थानिक संस्था कर भरण्यास व्यापारी फारसे उत्सुक नसल्याने उत्पन्नाची बाजूही लंगडी पडू लागली आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुमारे ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांना कशाच्या आधारे मंजुरी देण्यात आली, असा सवाल सातत्याने उपस्थित आहे. दरम्यान, गुप्ता यांच्या जागी आयुक्त म्हणून आलेले जयस्वाल यांनी उत्पन्न वाढीसाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक संस्था कर थकवणाऱ्या बिल्डरांचा शोध सुरू केला आहे.  

तिजोरीत दमडीही नाही
पालिका आयुक्त जयस्वाल यांनी आठ दिवसांपूर्वी उत्पन्नवाढीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेतील खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यात अनेक बिल्डर स्थानिक संस्था कर भरत नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अशा बिल्डरांच्या नव्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नका, असे आदेश शहरविकास विभागाला दिले होते. स्थानिक संस्था कर भरल्याचा दाखला मिळाल्यानंतरच बिल्डरांना बांधकामाची परवानगी द्या, असे आदेशही त्यांनी दिले. बिल्डरांकडून स्थानिक संस्था कराची वसुली करणारी ठोस अशी यंत्रणाच महापालिकेत अस्तित्वात नसून प्रशासकीय कामकाजातील अनेक त्रुटी यानिमित्ताने पुढे आल्या होत्या. अशा प्रकारे कर भरण्याआधीच बांधकाम परवानगी मिळविणाऱ्या बिल्डरांचा शोध सुरू केल्यानंतर शहर विकास विभाग आणि स्थानिक संस्था कर विभागाने संयुक्तपणे १७४ बिल्डरांना नोटिसा बजाविल्या आहेत, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. यातील काही बिल्डरांनी स्थानिक संस्था कराची साधी दमडीही महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेली नाही, अशी बाब प्राथमिक तपासात पुढे येऊ लागली आहे.