डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या जागी पुन्हा डॉ. देवगीकर
ठाणे : करोना रुग्णांची संख्या आणि मृत्युदर रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे असताना ठाणे महापालिकेत मात्र मुख्य आरोग्य अधिकारी पदाच्या जबाबदारीचा खेळ सुरूच आहे. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना लाच प्रकरणात अटक झाल्याने महिनाभरापूर्वी महापालिकेत रुजू झालेले डॉ. चारुदत्त शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला असून त्यांच्या जागी डॉ. वैजयंती देवगीकर यांची पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे हे दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर मुख्य आरोग्य अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या एकाही अधिकाऱ्याने वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. करोनाची पहिली लाट सुरू होताच महापालिकेने निवृत्त झालेले डॉ. केंद्रे यांना विशेष बाब म्हणून काही काळ सेवेत आणले. मात्र, तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांनी दीड-दोन महिन्यांतच त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले. त्यानंतर आजपर्यंत या पदावर एकही अधिकारी टिकू शकलेला नाही.
महापालिकेचे तत्कालीन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना मध्यंतरी व्हेंटिलेटर खरेदीसाठी लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली. या प्रकरणात महापालिकेची पुरती नाचक्की झाली. त्यानंतर प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. वैजयंती देगवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. याच काळात दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. त्यामुळे मुख्य आरोग्य अधिकारी पदावर शासनामार्फत अधिकारी नेमण्याची मागणी होऊ लागली होती. या मागणीनंतर राज्य शासनाने सेंट जॉर्ज रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. चारुदत्त शिंदे यांची प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती केली. डॉ. शिंदे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष अधिकारी चमूपैकी एक असल्याने ही नियुक्ती पालकमंत्र्यांच्या आदेशानुसारच करण्यात आल्याची चर्चा होती. परंतु महिनाभरातच प्रशासनाने त्यांना या पदावरून हटविले आहे.
चारूदत्ता शिंदे यांची पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक केली आहे. यासंबंधीचा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी गुरुवारी काढला.
राजकीय विरोधामुळे बदली?
पहिल्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने डॉ. चारुदत्त शिंदे यांची वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर ११ जून २०२० रोजी नेमणूक केली होती, परंतु करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात डॉ. शिंदे यांचा उपयोग होत नसल्याचे सांगत आयुक्त
डॉ. विपीन शर्मा यांनी ८ जुलै २०२० रोजी त्यांना पदावरून हटविले होते. वर्षभरानंतर करोनाची दुसरी लाट आल्यानंतर पालिका प्रशासनाने पुन्हा
डॉ. शिंदे यांची मुख्य आरोग्य अधिकारी पदावर नेमणूक केली. गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डॉ. शिंदे हे अपयशी ठरलेले असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीस भाजप तसेच काँग्रेस पक्षाने विरोध केला होता. या विरोधामुळेच प्रशासनाने त्यांना मुख्य आरोग्य अधिकारी पदावरून हटवल्याची चर्चा आहे.