११ पैकी आठ जागांवर विजय; राजू पाटील यांचे प्रयत्न अपयशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढलेल्या जागांमुळे सर्वच राजकीय पक्षांनी यंदा प्रतिष्ठेच्या केलेल्या दिवा परिसरात शिवसेनेने एकहाती विजय मिळवला असून परिसरातील ११ जागांपैकी आठ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपला विजयाची आशा होती, तसेच मनसेचे नेते राजू पाटील यांनीही या ठिकाणी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाटील यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले असून दिवेकरांनी शिवसेनेच्या पारडय़ात भरभरून मते टाकली.

पाच वर्षांपूर्वी दिवा परिसरात अवघ्या दोन जागा होत्या. यंदा नव्या प्रभाग रचनेत या ठिकाणी तब्बल ११ जागा वाढल्याने दिव्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते. डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील स्थानिक ग्रामस्थांसोबत हातमिळवणी करत महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धक्का दिला होता. यंदा दिव्यात याच पद्धतीची व्यूहरचना भाजपने केली होती.

ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी सुरुवातीपासून या भागात मोर्चेबांधणी सुरूकेली होती. येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबतीला  घेत भाजपने या ठिकाणी शिवसेनेपुढे आव्हान उभे केले होते.

पाच वर्षांपूर्वी येथील दोन जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले होते; मात्र काळाची पावले ओळखून शैलेश पाटील आणि सुनीता मुंढे या दोघा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शैलेश पाटील यांची या भागात चांगली ताकद आहे.  त्यांनी त्याचा योग्य वापर करीत लोकसंपर्क आणि संघटन वाढविले. त्यातच पाटील आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी हे दोघे विरोधक एकत्र आल्याने शिवसेनेची ताकद वाढली होती. त्याचाही फायदा पक्षाला झाला.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बालेकिल्ला टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. मनसेचे २७ गावांमधील नेते राजू पाटील यांनी राज ठाकरे यांना दिव्याच्या रणांगणात उतरवून पुढील विधानसभा निवडणुकीची गणिते बांधण्यास सुरुवात केली होती.

गेल्या दोन महिन्यांत राज दोन वेळा दिव्यात येऊन गेले; मात्र राज आणि राजू यांचा करिष्मा या वेळच्या पालिका निवडणुकीत ओसरल्याचे चित्र दिव्यात दिसून आले. दिव्यात मनसेने विजयासाठी मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली होती.

विजयी उमेदवार

दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनीता मुंढे, रमाकांत मढवी, शैलेश पाटील, अंकिता पाटील, दीपाली भगत, अमर पाटील

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal election results 2017 shiv sena win 8 seat in thane diva
First published on: 24-02-2017 at 00:46 IST