पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित; केवळ नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाच शिक्षण
ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ठाणे शहरातील खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र ठाणे महापालिकेच्या शाळांनी मात्र अद्याप ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले नाही. केवळ नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाच ऑनलाइन शिक्षण दिले जात असून पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत बालवाडी ते माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती आणि हिंदी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये शहरातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने अद्याप शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. असे असले तरी ऑनलाइनद्वारे शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अजून अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पूर्वप्राथमिकपासून आठवीपर्यंतच्या २९ हजार ७८६ विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक भवितव्य वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मुद्दय़ावरून प्रशासनाला धारेवर धरले. केवळ नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना यूटय़ूब आणि ऑनलाइनद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँॅग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली.
शिक्षण सुरू असल्याचा दावा
सध्या शाळा बंद आहे. प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. महापालिका शाळेतील शिक्षण करोनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवस सर्वेक्षणाचे काम करतात आणि पुढचे सात दिवस त्यांना सुट्टी देण्यात येते. ज्या वेळेस शिक्षक करोना सर्वेक्षणाचे काम करतात, त्या वेळेस ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी चित्रफीत पाठवीत असतात. तर, सात दिवस सुट्टी असते, त्या वेळेस झूम किंवा गूगल मीटद्वारे शिक्षण देतात, असे स्पष्टीकरण शिक्षण उपायुक्त मनीष जोशी यांनी दिले. महापालिका शाळेत येणारा विद्यार्थी गरीब असतो. त्यांच्याकडे मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा असते का, असा प्रश्न विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी उपस्थित केला. त्यानंतर शाळेमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरूच नसल्याचे उघड होताच सर्वपक्षीय नगसेवक आक्रमक झाले. अखेर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, यावर विचार करून शिक्षण विभागाला तसा नवा पर्याय सुचवावा, अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
गेल्या वर्षीची पटसंख्या
इयत्ता पटसंख्या
विद्यार्थी विद्यार्थिनी
बालवाडी ८२० ७७५
पहिली १५१० १४८९
दुसरी १६८३ १६६५
तिसरी १७५० १९३४
चौथी १८४५ १९२९
पाचवी १८२९ १९७४
सहावी १७९८ १९४०
सातवी १७६० १९२१
आठवी १५३१ १६३३
नववी ११६२ ११७५
दहावी ६९३ ८४२
एकूण १६,३८१ १७,२७७