|| नीलेश पानमंद

वेगळय़ा स्रोतांमधून उत्पन्नवाढीचे प्रयत्न; ठाणेकरांना दिलासा

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरांत वाढ करण्याचा विचार सुरू केला असताना, ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने (टीएमटी) मात्र, तुर्तास भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य स्रोतांमधून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

टीएमटीला प्रवासी भाडय़ापोटी ९.५२ कोटी रुपयांचे उत्पन्न महिन्याकाठी मिळते. मात्र, त्यापैकी ७५ टक्के म्हणजेच ७.२० कोटी रुपये कर्मचारी वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च होतात. आस्थापनावरील खर्चामुळे बसगाडय़ांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जेमतेम २५ टक्के निधी शिल्लक राहत असल्याने टीएमटीला आर्थिक गणिते जुळविण्यासाठी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनंतर टीएमटी प्रशासनाकडून बस भाडे वाढीसाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र टीएमटीकडून कोणतीही दर वाढ करण्यात येणार नसल्याने ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तसेच इंधन दरवाढीचा अतिरिक्त बोजा वाढत असला तरी विविध नवे स्रोत निर्माण करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

तरतूद व प्रत्यक्ष खर्च

गेल्या वर्षभरात टीएमटीने डिझेल खरेदीवर १७ कोटी ७ लाख ७० हजार ९८३ रुपये तर सीएनजी खरेदीवर १४ कोटी १५ लाख ८६ हजार ८५६ रुपये इतका खर्च केला. यंदाच्या अर्थसंकल्पात डिझेल खरेदीसाठी २५ कोटी ७० लाख रुपये तर सीएनजी खरेदीवर ८ कोटी ५८ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.