उद्योजकांसाठी महावितरणच्या पायघडय़ा!

महावितरणने आता राज्यात उद्योगव्याप्तीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली आहेत.

ठाणे, नवी मुंबईत नवीन उद्योगांना तत्काळ वीज जोडणी
विजेची टंचाई आणि भारनियमनाचे संकट यांमुळे महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका होत असताना या मुद्दय़ावरून आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेल्या महावितरणने आता राज्यात उद्योगव्याप्तीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली आहेत. ठाणे व नवी मुंबई पट्टय़ातील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात विजेच्या समस्येमुळे नाराज असलेल्या उद्योजकांना दिलासा देण्यासाठी या पट्टय़ात अखंडित वीजपुरवठा करण्याची योजना महावितरणने आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून तत्काळ वीज जोडणी, यंत्रणांची क्षमता वाढवून अखंड वीजपुरवठा, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कुशल कामगारांची मदत गाडी आणि नवे स्विचिंग स्थानक अशा सुविधांची घोषणा करण्यात आली आहे.
ठाणे-बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन (टीसा), स्मॉल स्केल इंटरप्रिनर्स असोसिएशन, नवी मुंबई, ठाणे मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, ठाणे, तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन तसेच बॉम्बे इंटरप्रिनर्स असोसिएशन मलुंड या औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी महावितरणच्या भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी एक बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातत ‘मेक इन महाराष्ट्र’ची घोषणा केली असून, त्या अनुषंगाने औद्योगिक गुंतवणूकदारांना सुलभतेने वीजपुरवठा देण्याकरिता महावितरण तत्पर असून मैत्री समन्वय कक्षच्या मदतीने नवीन उद्योगांना तत्काळ वीज जोडणी दिली जाईल. त्याबरोबरच अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा अधिक बळकट करण्यात येणार आहे. ठाणे व नवी मुंबई येथील स्मार्टसिटी योजनेद्वारे तळोजा एमआयडीसी येथे नव्याने २२ केव्ही क्षमतेचे स्विचिंग स्थानक उभारण्यात येणार आहे.
औद्योगिक ग्राहकांचे मीटर नादुरुस्त असतील त्यांचे मीटर तत्काळ बदलून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लघुदाब उद्योजक ग्राहकांना बिल भरण्यासाठी ऑनलाइन, मदत अ‍ॅप आणि एटीपी मशिनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तांत्रिक व नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी ठाणे व नवी मुंबई औद्योगिक विकास महामंडळासाठी कुशल कामगार सज्ज असलेली मदत वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांच्या स्वप्नपूर्तीसाठी महावितरणने ही पावले उचलली असून, मैत्रीपूर्ण सुसंवाद साधून उद्योजकांना योग्य दाबाचा व अखंडित वीजपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न कायम राहणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे महावितरण कमी पडणार नाही.
– सतीश करपे,
महावितरणचे मुख्य अभियंता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane new industries get immediate power connection

ताज्या बातम्या