ठाणे : शिवसेनेचे नेते (शिंदे गट) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाण्यात अनेकदा आलीशान वाहनांच्या ताफ्यात दिसतात. परंतु रविवारी ते दिसले रिक्षा चालविताना. मंत्रीच रिक्षा चालवित असल्याने ठाणेकर देखील अवाक झाले. निमित्त होते, कार्यकर्त्याने रिक्षा घेतल्याचे. कार्यकर्त्याने नवी रिक्षा घेतल्याने त्या कार्यकर्त्याने ती रिक्षा सरनाईक यांना दाखविण्यासाठी कार्यालयाबाहेर आणली होती. परंतु रिक्षा चालविण्याचा मोह सरनाईक यांना आवरता आला नाही. त्यांच्या समाजमाध्यमावरील खात्यावर त्यांनी रिक्षा चालवितानाचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडीओखाली ‘सामान्य माणसाचं जीवन जवळून समजून घेतलयं, कारण त्यांची वेदना समजली तरच त्यांचा नेतृत्त्व करता येतं’ असा उल्लेख केला आहे.
प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवडा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सरनाईक देखील शिंदे यांच्यासोबत गेले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घातली गेली. सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत. वर्तकनगर, घोडबंदर, मिरा भाईंदर क्षेत्रात सरनाईक यांचे प्रभाव आहे.
त्यांच्या एका कार्यकर्त्याने एक रिक्षा खरेदी केली होती. या रिक्षाच्या पुढील भागातील काचेवर त्या कार्यकर्त्याने सरनाईक यांचे छायाचित्र चिटकविले होते. तसेच त्यावर कार्य सम्राट असा उल्लेख होता. विशेष म्हणजे, रिक्षाचा ७५७८ हा क्रमांक होता. हा क्रमांक सरनाईक यांच्या सर्वच वाहनांना आहे. तो कार्यकर्ता सरनाईक यांच्या वर्तकनगर भागातील कार्यालया बाहेर रिक्षा घेऊन आला होता. रिक्षा पाहताच, सरनाईक थेट त्या रिक्षाच्या मुख्य आसनावर बसले.
त्यांनी स्टेअरिंग हाती घेतली आणि ठाण्याच्या रस्त्यावर रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणारे ठाणेकर हे पाहून आवाक झाले होते. रिक्षा चालवितानाचा व्हिडीओ देखील सरनाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रसारित केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडीओखाली ‘सामान्य माणसाचं जीवन जवळून समजून घेतलयं, कारण त्यांची वेदना समजली तरच त्यांचा नेतृत्त्व करता येतं’ असा उल्लेख केला आहे.