ठाण्यातील एका २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे. मागील आठवड्यात बुधवारी ठाण्यातील तीन हाथ नाका परिसरात एक तरुणी ठाण्यातील घोडबंदरच्या दिशेने जात असताना तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संतोष नामदेव लोखंडे ( वय ३८) आणि त्याचा मित्र लहू घोगरे (३९) या दोघांना अटक केली. या दोघांनी युवतीला गांधीनगर परिसरात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. ठाणे पोलिसांनी या ठिकाणावरील सर्व सीसीटीव्ही तपासून एका मिसिंगच्या तक्रारीवरुन या गुन्ह्याचा उलघडा केला.
ठाण्यातील तीन हाथ नाका परिसरात ७ जून रोजी एक युवती शेअर रिक्षाने मानपाडा परिसरात जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसली. रिक्षा चालक संतोष लोखंडे याने तिला नेत असताना त्याचा मित्र लहू घोगरे याला देखील रिक्षात बसवले. त्यानंतर माजिवडा जवळील गांधीनगर परिसरात त्यांनी या युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या मुलीने आरडा ओरड केल्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देवून तिला मारहाण केल्यानंतर त्यांनी पीडित तरुणीला रिक्षातून ढकलून दिले. यानंतर तरुणीवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिने हा सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दहा पथके देखील तयार केली होती. या पथकांनी दोन हजाराहून अधिक रिक्षा चालकांकडे चौकशी केली.
रिक्षा चालकांचा शोध घेत असताना पोलिसांना एका रिक्षावाल्याची मिसिंगची तक्रार दाखल झाल्याचे लक्षात आले. मिसिंग रिक्षा चालकाचा फोटो फिर्यादी पीडित तरुणीला दाखवल्यानंतर अपहरण करून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीपैकी हा आरोपी असल्याचे समोर आले. संतोष हा ठाण्यातील शासकीय रुग्णालयात भरती झाला होता. रुग्णालयातून सुटल्यानंतर संतोष आणि त्याचा साथीदार लहू हे दोघ फरार होणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबुल केला.