शीळ डायघर येथील उत्तरशीव भागात एकाची हत्या करून फरार झालेल्या निजामुद्दीन फकीर याला सात वर्षांनंतर जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून त्याने साथीदारांच्या मदतीने हत्या केली होती. गेल्या सात वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. नेपाळ तसेच उत्तर प्रदेशातील गुंड राजू इस्माईल टोळीचा तो सदस्य आहे.
ठाणे येथील खोपट भागात राहणारे प्रमोद रामराव शर्मा यांची २००९ मध्ये शीळ डायघरमधील उत्तरशीव भागात हत्या झाली होती. धारदार शस्त्राने त्यांचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले होते. उत्तरशीवमधील नाल्यात त्यांचा मुंडके नसलेला मृतदेह सापडला होता. नाल्यातील दगडांमध्ये त्यांचे मुंडके सापडले होते. या खून प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी असिरुद्दीन खान याला अटक केली होती, तर त्याचे दोन साथीदार निजामुद्दीन फकीर आणि रफिउल्लाह जैतुल्लाह हे दोघे उत्तर प्रदेशात पळून गेले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथके दोघांच्या मागावर होती, पण दोघे नेपाळमध्ये पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील गोरखपूर हे मूळ गाव असल्यामुळे दोघे अधूनमधून तिथे येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून निजामुद्दीनला अटक नुकतीच केली आहे. रफिउल्लाह हा अजूनही फरार असून पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत. उत्तर प्रदेशातील मोहने पोलीस ठाण्यात निजामुद्दीनविरोधात खून, दरोडा, जबरी लूट व भारतीय हत्यार कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल असून तो तेथील रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये दहशत असलेल्या कुख्यात राजू इस्माईल गँगचा तो सदस्य असल्याची बाबही तपासात समोर आली आहे.
खून प्रकरण..
ठाण्यातील खोपट भागात राहणारे प्रमोद शर्मा हे जमीन दलालीचा व्यवसाय करीत होते. या व्यवसायानिमित्ताने त्यांचे शीळ डायघर भागात येणे-जाणे होते. यातूनच त्यांची असिरुद्दीन, निजामुद्दीन आणि रफिउल्लाह यांच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीतूनच पुढे तिघांनी भागीदारीमध्ये भंगार व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते, मात्र तिघांनी त्या रकमेचा अपहार केल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे व्यवसायासाठी दिलेली २५ लाखांची रक्कम परत देण्याची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाले होते. दरम्यान, ही रक्कम परत द्यावी लागू नये म्हणून तिघांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणात असिरुद्दीनला अटक झाली होती, तर निजामुद्दीन आणि रफिउल्लाह फरार झाले होते. या दोघांपैकी निजामुद्दीनला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police caught criminal
First published on: 04-05-2016 at 00:10 IST