भिवंडीतील चार गोदामांवर कारवाई; काळा गूळ, पिवळसर साखर जप्त
मुंबई येथील मालवणी भागातील विषारी दारूकांडाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून ठाणे पोलिसांकडून शहरातील हातभट्टय़ांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने भिवंडीतील चार गोदामांवर कारवाई केली आहे. या गोदामातून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ आणि पिवळसर रंगाची साखरेची पावडर असा एकूण १८३ टनाचा साठा जप्त केला आहे.
नऊ महिन्यांपूर्वी मालवणीत घडलेल्या विषारी दारूकांडानंतर राज्यातील हातभट्टय़ा पोलिसांच्या रडारवर आल्या होत्या, तसेच अशा भट्टय़ांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी सर्व आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेदरम्यान ठाणे तसेच आसपासच्या शहरातील खाडीकिनारी भागात लपूनछपून हातभट्टय़ा लावण्यात येत असल्याची बाब पुढे आली होती, तसेच मोहिमेमध्ये पोलिसांच्या पथकांनी अशा हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून अशाप्रकारची कारवाई सातत्याने होत आहे. असे असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने भिवंडीतील चार गोदामांवर कारवाई केली आहे. या गोदामांमधून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ आणि पिवळसर रंगाची साखरेची पावडर असा एकूण १८३ टनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही साठय़ाची किंमत जवळपास ४६ लाखांच्या घरात आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. कल्याण परिसरात राहणारे दीपक खेमाणी यांची हे चारही गोदामे आहेत.
साठा तपासणीसाठी प्रयोगशाळेत
या गोदामांमध्ये एक टन नवसागरही आढळून आले आहे, मात्र नवसागर तयार करण्याचा अधिकृत परवाना कंपनीकडे आहे. त्यामुळे नवसागर जप्त करण्यात आले नाही. काळा गूळ आणि पिवळसर रंगाची पावडर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येत असते. त्यामुळे गोदामातून जप्त मालाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.