ठाणे : ठाणे येथील लोकमान्यनगर भागातील टिएमटी बस आगारासमोरील रस्ता काँक्रीट करण्याचे काम महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपुर्वी हाती घेतले. पावसाळ्यापुर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत हे काम पुर्ण करण्यात येणार होते. मात्र, रस्त्याखाली असलेली जुन्या मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर खचल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम आधी हाती घ्यावे लागले असून यामुळे रस्ते कामास विलंब झाला आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून खोदाई कामामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी बंद असल्याने आगारातून इतर वाहनांची वाहतूक होत असून त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

ठाणे येथील लोकमान्यनगर भागात टिएमटीचा आगार आहे. या आगारासमोरील रस्त्यावरून टिएमटी तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता डांबरी होता. या डांबरी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय पालिकेने काही महिन्यांपुर्वी घेऊन त्याचे काम दोन महिन्यांपुर्वी हाती घेतले होते. पावसाळ्यापुर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत हे काम पुर्ण करण्याचे पालिकेने ठरविले होते. त्यानुसार पालिकेकडून कामाची आखणीही करण्यात आली होती. या रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याखालील मलवाहिन्या आणि चेंबर उभारणीचे काम सुरू असून अद्याप रस्ते कामास सुरुवात झालेली नाही. या कामांमुळे हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक आगारातून वळविण्यात आली आहे. यामुळे आगारातील बस वाहतूकीस इतर वाहतूकीमुळे अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी पुर्ण होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून येथील नागरिक या मार्गानेच प्रवास करतात. काही नागरिक येथून पायी येजा करतात. या खोदकामाच्या ठिकाणी पावसाळ्यात अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

लोकमान्य आगार येथून ठाणे स्थानक तसेच इतर भागात टिएटी बसगाड्या सोडण्यात येतात. यामुळे दररोज कामावर जाणाऱ्या नागरिकांची सकाळ आणि सायंकच्च्या वेळेत मोठी वर्दळ असते. त्यातच आगारातून होणाऱ्या इतर वाहतूकीमुळे नागरिकांना धडक बसून अपघात होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलवाहिनी चेंबर खचले

लोकमान्यनगर बस आगारसमोरील रस्ता काँक्रीट करण्याच्या कामासाठी खोदण्यात आला. त्यावेळी या रस्त्याखाली असलेले मलनिस्सारण चेंबर खचण्यात आल्याचे दिसून आले. हे चेंबर खूप जुने असल्यामुळे ते खचण्यात आले. त्यामुळे आधी चेंबर बांधणी आणि मलनिस्सारण वाहिनी जोडणीचे काम हाती घ्यावे लागल्याने रस्ते काम लांबणीवर पडले, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता ऋषीकेश जवळकर यांनी दिली. दरम्यान, या मार्गावरून पुढे काही अंतरावरील डांबरी रस्ता दोनदा खचल्याचा प्रकार यापुर्वी पुढे आला होता.