मानसी जोशी
ठाणे शहराचा ऐतिहासिक वारसा असणारे आणि अनेक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणारे टाऊन हॉल आणि अँफी थिएटर हे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दुरुस्तीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. टाऊन हॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा तर थिएटरला छत बसवण्यात येणार असून ध्वनियंत्रणाही अद्ययावत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थिएटरच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली असून दुरुस्तीनंतर दिवसाला दोन्ही सत्रात टाऊन हॉल आणि थिएटर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहासोबतच शहरातील विविध कट्टय़ांवर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतात. कोर्ट नाका येथील टाऊन हॉल आणि अँफी थिएटर या ठिकाणी देखील मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या वास्तूंचे नुतनीकरण व्हावे आणि येथील सुविधा अधिक अद्ययावत असाव्यात अशी सांस्कृतीक क्षेत्रात वावर असणाऱ्यांची गेल्या काही वर्षांची मागणी होती. त्यानुसार थिएटरच्या कामाची निवीदा प्रशासनाकडून काढण्यात आली असून या नुतनीकरणासाठी ७४ लाख ५८ हजार ५९० रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अडगळीत असलेल्या थिएटरच्या जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी कलाकारांसाठी कलादालन आणि सायकल कट्टा सुरु करण्यात येणार आहे. प्रत्येक आठवडय़ाला ठाण्यातील तरुण कवी आणि लेखक यांना व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार येणार असल्याचे टाऊन हॉलचे व्यवस्थापक सदाशिव कुलकर्णी यांनी सांगितले. तर पुढील काही दिवसात टाऊन हॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्याच्या कामाचीही निविदा मागवण्यात येणार आहे. या नुतनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर टाऊन हॉल आणि अँफी थिएटर २६ जुलै पासून बंद ठेवण्यात आले असून काम पूर्ण होण्यास २०२० उजाडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१५ मध्ये अँफी थिएटरचे उदघाटन करण्यात आले होते. २५० ते ३०० आसनक्षमता असलेल्या अँफी थिएटरमध्ये अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आतापर्यंत येथे उर्दू शायरी आणि संगीताचे कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन आणि चर्चासत्र, मान्यवरांच्या मुलाखती यासारखे विविध कार्यक्रम पार पडले आहेत.
दुरुस्तीनंतर दोन सत्रांसाठी उपलब्ध
या अगोदर टाऊन हॉल आणि अँफी थिएटर हे दिवसातून एका सत्रासाठी भाडेतत्त्वावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देण्यात येत असे. दुरुस्तीनंतर दोन्ही सत्रात टाऊन हॉल आणि अँफी थिएटर चालवण्यात येणार आहे. सध्या टाऊन हॉलसाठी २ हजार रुपये तर अॅम्फी थिएटरमध्ये कार्यक्रम करण्यासाठी १ हजार ५०० रुपये इतके भाडे दर आकारण्यात येते. दुरुस्तीनंतर दोन्ही सत्रासाठी टाऊन हॉल आणि अँफी थिएटर भाडेतत्वावर देण्यात येणार असल्यामुळे यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होईल असे टाऊन हॉलच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.
नूतनीकरणाच्या कामामुळे सहा महिन्यांकरिता टाऊन हॉल आणि अँफी थिएटर बंद राहणार आहे. सुशोभीकरणसोबतच अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी सुरू करण्याचा विचार आहे.
– सदाशिव कुलकर्णी, व्यवस्थापक टाऊन हॉल.