ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात चार करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाने मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रुग्णांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन योग्य कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान भाजपासोबत मनसे कार्यकर्तेही रुग्णालयाबाहेर जमले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णालयात ५३ रुग्ण दाखल असून चौघांचा मृत्यू झाला असल्याचं सांगत पालिका प्रशासनाने यामागे वेगळं काही कारण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंबंधी रुग्णालयाकडून अधिकृत माहिती दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

निरंजन डावखरेंकडून कडक कारवाईची मागणी
“वेदांत रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले यामागे रुग्णालय दोषी आहे की महापालिका प्रशासन यासंदर्भातील जिल्हाधाऱ्यांची तीन भेट घेत आहोत. यासंबंधी सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर दोषी यांच्यावर कडक कारवाई होणं अपेक्षित आहे. ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना अशा प्रकारची घटना निषेधार्ह आहे. ज्यांचं निधन झालं आहे त्यांच्या नातेवाईकांकडून बिल घेतलं जाऊ नये अशी भूमिका आम्ही घेतली आहे,” असं भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

रुग्णालयाबाहेर फौजफाटा
दरम्यान रुग्णालयाबाहेर नातेवाईकांसोबत मनसे आणि भाजपाचे पदाधिकारी जमले असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. भाजपासोबत मनसेकडूनही झालेल्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे पालिकेकडून चौकशी समिती
चार रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी गठीत करण्यात आली असून यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल अशी माहिती ठाणे पालिकेकडून देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane vedant hospital covid patients death bjp mns sgy
First published on: 26-04-2021 at 13:14 IST