scorecardresearch

डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठाकडील रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी बंद

या रस्त्यांच्या बदल्यात पर्यायी रस्ते मार्गाचा प्रवाशांनी अवलंब करावा, असे आवाहन कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठाकडील रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी बंद

डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली पंचानंद भागातील स्वामी समर्थ मठ, भोपरकडे जाणारे रस्ते नांदिवली भागातील रस्त्यांचे सिमेंटीकरण, नाल्याच्या बांधणी कामासाठी गुरुवारपासून काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहेत. या रस्त्यांच्या बदल्यात पर्यायी रस्ते मार्गाचा प्रवाशांनी अवलंब करावा, असे आवाहन कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे डोंबिवलीतील काही रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रस्ते कामांचे उद्घाटन झाले आहे. उद्घाटन होऊन दोन महिने उलटले तरी रस्ते काम सुरू होत नसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजी आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांची बांधकामे या रस्त्याने बाधित होत आहेत. या बांधकामांना धक्का लागणार असल्याने या कामांना विलंब होत असल्याची चर्चा नांदिवली पंचानंद भागात आहे. काही राजकीय मंडळींची बांधकामे विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यामध्येच आहेत. हे कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांना संपर्क करुन बांधकाम वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे समजते.

हेही वाचा >>> VIDEO : मेट्रोचा लोखंडी पत्रा अंगावर पडून महिलेचा मृत्यू

रस्ता बंद

पालिका अधिकारी आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत या भागातील नांदिवली नाला ते स्वामी समर्थ चौक दरम्यानच्या रस्त्याचे आणि नाल्याचे सात हजार मीटरचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करताना वाहतुकीत अडथळा नको म्हणून कोळसेवाडी वाहतूक विभागाने या भागातील रस्ते बंद करुन पर्यायी रस्ते वाहन चालकांना उपलब्ध करुन दिले आहेत. वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी यासंबंधीचा आदेश जाहीर केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण : पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुटणारा चोरटा अटक

प्रवेश बंद व पर्यायी रस्ते

नांदिवली नाला येथून स्वामी समर्थ चौक, साईबाबा मंदिर, सागाव, कल्याण शिळफाटा रस्ता दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लक्ष्मीकांत हाॅटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या भागातील वाहन चालक, प्रवाशांनी नांदिवली नाला येथे डावे वळण घेऊन नांदिवली नाल्याच्या समांतर रस्त्याने गांधीनगर चौक, स्वामी समर्थ मठ, पी ॲन्ड टी काॅलनी चौक येथे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे.

स्वामी समर्थ मठ येऊन डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे प्रगती महाविद्यालय, शिवमंदिर रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ओम साई जम्बो वडापाव सेंटर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहने स्वामी समर्थ चौक येथून उजव्या बाजुला वळण घेऊन पी ॲन्ड टी काॅलनी, गांधीनगर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

नागरी वस्तीचे, शाळा परिसराचे हे भाग असल्याने या भागातून वाहने चालविताना वाहन चालकांनी ३० किमी तासाची वेगमर्यादा ठेवायची आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे, असे वाहतूक अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

“नांदिवली नाला ते स्वामी समर्थ मठ दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंटीकरण, नाला बंदिस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ‘एमएमआरडीए’ने रस्ते बांधकाम पूर्ण झाल्याचे कळविल्यावर हे रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत.”

-रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी, वाहतूक विभाग

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 13:30 IST

संबंधित बातम्या