पालघरच्या पोलीस अधीक्षकांचे नवे अ‍ॅप; कामचुकारपणाला लगाम

पालघर जिल्ह्यातील पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवर आता वरिष्ठांमार्फत खास नजर ठेवली जाणार आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी ‘थर्ड आय’ नावाचे अ‍ॅप विकसित केले असून प्रत्येक पोलिसाच्या मोबाइलमध्ये ते डाऊनलोड करणे अनिवार्य केले आहे. यामुळे कर्तव्यावर असताना कुठे आहेत, गस्तीवर कुठे गेलेत त्याची इत्थंभूत माहिती पोलीस अधीक्षकांना मिळणार आहे. कामचुकार पोलीस आणि हप्त्यासाठी अनैतिक धंदेवाल्यांकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे.

पालघर जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यातील हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य नसते. हे पोलीस कर्तव्यावर असताना गस्तीसाठी नेमके कुठे गेले, ते खरेच गस्तीवर गेलेत का हे कळत नाही. गस्तीच्या नावाखाली पोलीस खासगी कामासाठी जात असल्याचे आढळून आले आहे. गुन्ह्यच्या घटनास्थळी खरेच पोलीस अधिकारी होते का हेदेखील कळत नाही. पोलीस जी मौखिक माहिती सांगतील किंवा डायरीत ज्या नोंदी करतील त्यावरच वरिष्ठांना विश्वास ठेवावा लागतो. यावर तोडगा म्हणून पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी ‘थर्ड आय’ नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. जीपीआरएस प्रणालीवर असलेले हे अ‍ॅप प्रत्येक पोलिसाच्या मोबाइलमध्ये टाकणे अनिवार्य केले आहे. यामुळे डय़ुटीवर असलेला पोलीस नेमका कुठे आहे हे अधीक्षकांना कळणार आहे. पोलिसांनी गस्तीवर जाण्यापूर्वी गाडीचा क्रमांक या अ‍ॅपमध्ये टाकायचा. ही गस्तीची  गाडी कुठे जाते त्याचा ठावठिकाणा अधीक्षकांना कळणार आहे. रात्रीच्या वेळी अनेक पोलीस अधिकारी पेट्रोलिंगला गेल्याची थाप मारतात. या अ‍ॅपमुळे गस्तीचा मार्ग, किती किलोमीटर गस्त घातली त्याची नोंद होणार आहे. हा सर्व डेटा कायमस्वरूपी साठवला जाणार आहे. पोलिसांना कुठल्याही सबबी किंवा थापा मारता येणार नाहीत.

खोटय़ा सबबी बंद

‘थर्ड आय’मुळे आता कामचुकार पोलिसांच्या खोटय़ा सबबी बंद होणार आहेत, कारण खोटे बोलले तर अ‍ॅपमुळे लबाडी उघडकीस होणार आहे. अनेकदा पोलीस बेकायदा आणि अनैतिक धंदे करणाऱ्यांकडे पैसे घ्यायला जातात. या ठिकाणी का गेला होता त्याचा जबाब वरिष्ठांना द्यावा लागेल त्यालाही चाप बसणार आहे.

प्रत्येक गुन्ह्यच्या नोंदी थेट घटनास्थळावरून

एखादा गुन्हा घडला की त्याची माहिती बिनतारी यंत्रणेद्वारे (वायरलेस) आणि नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर अधीक्षकांना मिळायची, पण आता गुन्ह्याच्या घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना त्याच ठिकाणाहून माहिती पोलीस अधीक्षकांना देण्यासाठी या अ‍ॅपमध्ये अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस गेल्याचे निश्चित होणार आहे. त्याचा फायदा गुन्ह्याचा तपास करण्याकामी येणार आहे. ही माहिती नियंत्रण कक्षाकडेही जमा होईल. गुन्ह्याचे नेमके ठिकाण अगदी शास्त्रीय पद्धतीने समजले जाणार आहे. गुन्हेगाराचा माग घेणे सोपे होणार आहे.

आम्ही सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे अ‍ॅप सुरू केले आहे. दिवाळीनंतर अधिकृतपणे हे अ‍ॅप सुरू केले जाणार आहे.

मंजुनाथ सिंगे, पोलीस अधीक्षक