ठाणे : भिवंडी येथील अरमान शाह (३५) याच्या हत्येप्रकरणी निजामपुरा पोलिसांनी तीन जणांना अटक केली. मोहम्मद सलमान शेख (२७), तस्लीम अन्सारी (३०) आणि चांदबाबू अन्सारी (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहे. अरमान हा पत्नीवर वारंवार संशय घेत होता. याचा राग आल्याने तिघांनी मिळून ही हत्या केली आहे.

भिवंडी येथील कांबेगाव येथील रुपाला पुलाखाली २० जानेवारीला एका गोणीमध्ये अरमान याचा मृतदेह निजामपुरा पोलिसांना आढळून आला होता. त्याच्या गळा, छाती आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपायुक्त योगेश चव्हाण आणि साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके तयार केली. पोलिसांनी मृतदेहाचे खिसे तपासले असता त्यामध्ये पोलिसांना डॉक्टरचे हस्ताक्षर असलेली चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी हस्ताक्षराच्या आधारे डॉक्टरचा शोध घेतला. परंतु डॉक्टरकडे रुग्णाची पुरेशी माहिती नव्हती. दवाखान्याच्या भागात पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असता, एक महिला तिच्या पतीला शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने या महिलेला गाठून तिला आणि तिच्या मुलाला मृताचे छायाचित्र दाखविले. तिच्या मुलाने चेहऱ्यावरील तिळावरून हा त्याच्या वडिलांचा मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. त्या वेळी हा मृतदेह अरमान शाह याचा असल्याचे समोर आले. त्याच वेळी मोहम्मद सलमान नावाचा एक व्यक्ती हा खून त्याच्यासमोर झाल्याचे पोलिसांना सांगत होता. पोलिसांना त्याचा संशय येऊ लागल्याने त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतर दोन साथीदारांच्या मदतीने त्याने हा खून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तस्लीम आणि चाँदबाबू या दोघांनीही उत्तर प्रदेशात पळून जाण्यापूर्वी ताब्यात घेतले. पोलिसांनी तिघांची चौकशी केली असता, अरमान याची पत्नी आणि तिघे आरोपी मणी कारखान्यात कामाला होते. अरमानची पत्नी आणि आरोपी एकमेकांशी बोलत असे. परंतु अरमानला त्यांचे बोलणे खटकत असे. अरमान पत्नीवर संशय घेत असल्याने त्यांनी अरमानच्या डोक्यात, छातीत आणि गळय़ावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून कांबेगाव येथे फेकून दिला.